करमाळा (सोलापूर) : रस्त्याच्या कारणावरून भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये चुलत्यासह चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. वडशिवणे येथे हा प्रकार घडला आहे. मधुकर ज्ञानदेव काळे, सुहास मधुकर काळे, दत्तात्रय मधुकर काळे व संदीप मधुकर काळे (सर्व रा. वडशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. यामध्ये बळीराम ब्रह्मदेव काळे (वय 42, व्यावसाय शेती, रा. वडशिवणे, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर टेंभुर्णी येथे उपचार सुरू आहेत. 13 तारखेला हा वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातून ही फिर्याद दिली आहे.
फिर्यादी बळीराम यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या शेजारी चुलते मधुकर काळे यांची जमीन आहे. त्यामधून कॅनल ते कविटगाव जाणारा रस्ता आहे. फार पूर्वीपासूनचा हा रस्ता आहे. याचा वापर बहुतांशी शेतकऱ्यांना झालेला आहे. चुलते मधुकर व त्यांची मुले सुहास, दत्तात्रय, संदीप हे मात्र आम्हाला त्रास देतात. त्यामुळे आम्ही प्रशासनाच्या मदतीने हा रस्ता वहिवाट करून घेतला होता. मात्र आम्ही तयार केलेला रस्ता चुलते मधुकर व त्यांच्या तीन मुलांना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी आमच्याशी भांडण करून कुटुंबियांना शिवीगाळ व दमदाटी करत जीव मारण्याची धमकी दिली होती.
3 तारखेला दुपारी व वाजताच्या सुमारास वडील ब्रह्मदेव ज्ञानदेव काळे, आई, भावजय व पत्नी घरी असताना मी शेतात दैनंदिन कामे करत होतो. तेव्हा संशयित आरोपींनी त्यांना गजाने मारहाण केली. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत त्यांनी मारहाण केली ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील गज माझ्या डोक्यात, तोंडावर, हातावर आणि पायावर मारून मला व वडिलांना जखमी केली. त्यात माझ्या डाव्या बाजूच्या बरगड्या मोडल्या आहेत. पत्नी व भावजय यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. मी जखमी अवस्थेत मोबाईलमधील शूटिंग करत असताना हातातील मोबाईल बळजबरीने घेतला व मारहाण केली. त्यानंतर आम्हाला मारहाणीमध्ये गंभीर दुखापत झाल्याने आमच्या नातेवाईकांनी टेंभुर्णी येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणांमध्ये करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास सुरू आहे.