करमाळा (सोलापूर) : श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन २१ जुनला रावगाव येथे होणार आहे. त्यापुढचा प्रवास हा करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील सुमंथनगर, जुना हाॅटेल दुर्गा पॅलेस, कुंभारवाडा पुल, संभाजीनगर, किल्ला वेस मार्गे शहरात जाणार असुन तत्पुर्वी या मार्गावरील करमाळा नगरपालिकेने स्वच्छता करावी, अशी मागणी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकडे माजी नगरसेवीका बानु जमादार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जमादार यांनी निवेदनात म्हटले आहे की, श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी प्रभाग क्रमांक एक मधुन दरवर्षी येते. परंतु या मार्गात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी वेड्या बाभाळीची झाडी आली आहेत. कुंभारवाडा पुलाच्या दोन्ही बाजुस धोकादायक खड्डा आहेत. संभाजीनगर बारवविहीर समोरील रस्ता खराब झालेला आहे. रस्त्यावर लहान लहान दगडे पडलेली आहेत. घाण प्रचंड प्रमाणात झालेली असुन मुख्याधिकारी यांना वारंवार सांगुन दुर्लक्ष करत आहेत. तरी पालखी येण्यापुर्वी सदरचा रस्ता व साफसफाई स्वच्छता करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.