करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातून मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या उपोषणाला 50 हजारापेक्षा जास्त मराठा समाज बांधव जातील, असे नियोजन केले जात आहे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात तालुका समन्वयक बैठका घेणार आहेत. याचे नियोजन आजच्या (रविवारी) बैठकीत करण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मुंबईत उपोषण करणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी करमाळ्यात विकी मंगल कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ‘चलो मुंबई विचार विनिमय व नियोजन’ बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा समन्वयक उपस्थित आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या बैठकीची सुरुवात झाली.
‘आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर व्यवस्था बदलण्याची ताकद मराठा समाजात आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. फक्त मराठा समाजाला आरक्षण देऊन चालणार नाही तर आमचे आरक्षण जेव्हापासून खाले तेही वसुल करण्याची ताकद मराठा समाजात आहे. त्यामुळे प्रत्येक गावात तालुका समन्वयकांनी बैठक घेऊन 20 तारखेच्या आंदोलनाची तयारी करा’, असे जिल्हा समन्वयकांनी सूचित केले आहे.
दरम्यान या बैठकीत मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाण्यासाठी आपण १०० गाड्या देणार असून सोलापुरातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व समाज बांधवांची व्यवस्था भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्था येथे केली जाईल, असे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी ही अरपारची लढाई असून मुलांच्या भवितव्यासाठी यामध्ये उतरा आणि मनोज जरांगे यांना पाठींबा द्या, असे आवाहन जिल्हा समन्वयकांनी केले आहे.