करमाळा (सोलापूर) : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता. ४) सायंकाळी ६ वाजता सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली आहे.
श्रीराम प्रतिष्ठान दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करते. गेल्यावर्षी २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला होता. यावर्षी ३१ जोडप्यांचा विवाह पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी ३१ वरासाठी घोडे, उंट यांची व्यवस्था करण्यात आली आहे. २ बेंजो वाद्याच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत सर्व वरांची करमाळा शहरातून वरात काढण्यात येणार आहे. यासाठी सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत जेवण्याची व्यवस्था असणार आहे.
वारकरी सांप्रदायतील अनेक नामांकित महाराज मंडळी व वरिष्ठ पातळीवरील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. विवाहस्थळी वधूवरांना स्वतंत्र जानवसघरांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीराम प्रतिष्ठान १३ वर्षांपासून करमाळा शहरातील गरजूना भोजन देत आहे. याबरोबरच बाहेरगावाहून करमाळा शहरात रूमवर राहून शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना रात्रीचे जेवण देत आहे. सांगली- कोल्हापूर पूर परिस्थिती वेळी ही प्रतिष्ठानने तेथील लोकांना मोठी मदत केली होती. या शुभविवाहप्रसंगी नववधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन चिवटे यांनी केले आहे.