करमाळा (अशोक मुरूमकर) : श्रीराम प्रतिष्ठणच्या वतीने आज (रविवारी) करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाचे दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे आदींच्या उपस्थितीत 31 नववधू विवाह बंधनात अडकले. गायक संदीप पाटील यांच्या टीमने मराठी व हिंदी गीत गात उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास राजकीय, सामाजिक, साहित्यक, कला व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या साक्षीने अतिशय नाययनीयदीप असा हा सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात एक नवरी थेट दिल्लीवरून विमानाने आली होती. ती नवरी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयत शिक्षण घेत असून तिची दिल्ली येथील परेडसाठी निवड झाली होती. रीया परदेशी असे तिचे नाव आहे. ती करमाळा येथील रेणुका नगर येथे कुटुंबासह राहते.
रिया ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. एसवायमध्ये ती शिक्षण घेत आहे. 26 जानेवारीच्या निमित्त दिल्ली येथील आरडी परेडमध्ये तिची निवड झाली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ती एकमेव विद्यार्थिनी होती. एक महिना ही आरडी परेड होती. यामुळे ती थेट पोलिस भरती होऊ शकणार आहे. तिचा विवाह शिवलालसिंग (रा. नारायणपूर, जि. बिदर, कर्नाटक) यांच्याशी जुळला. त्यांनी खर्चाला फाटा देत करमाळ्यातील सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करण्याचा निर्णय घेतला.
विवाहाचा दिवस जवळ येत होता मात्र नवविवाहित ही शैक्षणिक कारणासाठी दिल्लीत होती. १ तारखेला ती रेल्वेने करमाळ्यात येणार होती. मात्र तिची दिल्लीतून ट्रेन चुकली. मात्र तिच्याच स्वतःचा विवाह मुहूर्त टळणार की काय अशी परिस्थितीत निर्माण झाली होती. मात्र यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे, प्राचार्य एल. बी. पाटील यांनी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रियाच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरून तिला विमाने दिल्लीवरून पुण्यात येण्यासाठी मदत केली, प्रा. प्रदीप मोहिते यांनी सांगितले.