करमाळा (सोलापूर) : ठसकेबाज कडक लावणी… हिंदी व मराठी चित्रपटातील गाण्यासह रिकेक्सवर केले नृत्य आणि एकास एक सादर केलेल्या कलेने आज (सोमवार) यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर दणाणू गेला. त्याला निमित्त होते स्नेह संमेलन व विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या वाढिदवसाचे! यावेळी विद्यार्थ्यांनी अंगावर शहारे आणणारे मलखांबाचे प्रात्यक्षिक देखील सादर केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या मंचावर हे स्नेह संमेलन झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला होता. डीजेच्या तालावर लावणी व लोकगीते सादर करून विद्यार्थ्यांनी कला सादर केली. कलेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक विषयांवर भाष्य देखील केले. सोशल मीडियाचे दुष्परिणाम, बदलत्या जीवनशैलीचा आयुष्यावर झालेले परिणाम यावरही कलेच्या माध्यमातून विद्यार्थिनी जनजगृती केली. लोकशाहीमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मतदान. यावरही विद्यार्थ्यांनी भाष्य करत जनजगृती केली.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात स्नेह संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कला पहाण्यासाठी गर्दी केली होती. शिट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी कलाकरांना दाद दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व नियोजन समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतले.