करमाळा (अशोक मुरूमकर) : सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारीबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवार गटाचे अभयसिंग जगताप यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अभयसिंग जगताप हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप केला जात आहे. उमेदवारी मिळण्याआधीच जगताप हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसतील तर निवडून आल्यावर काय करतील? असा प्रश्न केला जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून जगताप यांची मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यानुसार जगताप यांचे करमाळा दौरे सुरु आहेत. मात्र सुरुवातीपासूनच जगताप हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचे आरोप आहेत. एका दौऱ्यात ‘पत्रकारांशी संवादा’वेळीही त्यांच्या नियोजनाचा अभाव दिसून आला होता. त्यामुळे पत्रकारांनी त्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतरही त्यांच्या नियोजनात अभाव दिसत आहे. कार्यकर्तेही जगताप फक्त मोजक्याच लोकांना भेटतात असा आरोप करत आहेत. नुकतेच ते करमाळा दौऱ्यावर आले होते, तेव्हा कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्याशी सवांद साधून नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
अभयसिंग जगताप यांनी करमाळ्यात दौरे वाढवले आहेत. मात्र अनेकांना ते कधी येतात आणि कोणाला भेटून जातात हेच कळत नसल्याचे सांगितले जात आहे. जगताप यांचा करमाळ्यातील कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की नाही हेच कळत नसल्याची चर्चा आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत सामान्य नागरिकांमध्ये सध्या सहानुभूती आहे. ही संधी शोधणारा उमेदवार माढा मतदार संघात आवश्यक आहे. जगताप आताच कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसतील, तर विजयी झाल्यानंतर काय करतील? अशी चर्चा सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) तालुकाध्यक्ष संतोष वारे म्हणाले, अभयसिंग जगताप हे योग्य समनव्य ठेऊन काम करत आहेत. त्यांचा थेट नागरिकांचा संपर्क आहे.