करमाळा (अशोक मुरूमकर) : सतत होणारा वाद सामंज्यसपणे मिटवण्यासाठी एकत्र आलेल्यामध्येच तुंबळ मारहाण झाली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे पोलिस पाटलासमोरच हा वाद झाला, त्यांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या वादात पाचजणांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथे घडला आहे. सोमनाथ नरुटे व त्यांची पत्नी नीता नरुटे अशी गंभीर जखमी झालेल्याची नावे आहेत. यामध्ये सुधीर मारुती नरुटे (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे.
यामधील गंभीर जखमी नरुटे यांच्या कमरेजवळ दाताळाने व लाकडी काठीने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये सुभाष पांडुरंग शिंदे, रवींद्र सुभाष शिंदे, शांतीलाल पांडुरंग शिंदे, सुनील पांडुरंग शिंदे (सर्व रा. खांबेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) व एक महिला अशा पाच जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी नरुटे यांनी म्हटले आहे की, ‘आम्हाला खांबेवाडी शिवारात साडेपाच एकर शेती आहे. ती आमच्या तीन भावांच्या नावाने आहे. माझा मोठा भाऊ सोमनाथ मारुती नरोटे व त्याची पत्नी नीता सोमनाथ नरोटे हे त्यांच्या कुटुंबासह आमच्या शेजारी विभक्त राहत आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. तसेच एक सावत्र भाऊ आजिनाथ मारुती नरोटे हा त्यांच्या कुटुंबासह विभक्त राहत आहे. आमच्या शेजारीच सख्खा मामा (संशयित आरोपी) सुभाष पांडुरंग शिंदे, रवींद्र सुभाष शिंदे, शांतीलाल पांडुरंग शिंदे व गुन्हा दाखल झालेली महिला हे कुटुंबासह एकत्र राहतात. आमची सर्वांची घरे एकमेकांच्या लगत असल्याने ये-ना त्या कारणावरून आमच्याशी वाद- विवाद व शिवीगाळ होत असते. परंतु आम्ही त्याबाबत समजूतीची भूमिका घेत होतो.’
पुढे त्यांनी म्हटले आहे की, ’11 तारखेला सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान समजुतीने वाद मिटवण्यासाठी भाऊ सोमनाथ नरोटे व वहिनी या दोघांना गावातील तालमीच्याजवळ भांडणे मिटविण्याकरता बोलाविले. त्यामुळे ते गेले होते. तेव्हा गुन्हा दाखल झालेल्या संशयीतानी त्यांना लोखंडी दाताळाने व लाकडी काठीने मारहाण केली. तेव्हा भाऊ रक्तबंबळ झाला होता. वहिनी भावाला वाचवण्याकरता जात असताना तिलाही संबंधित फिर्याद आरोपी महिलेने केसाला धरून लाथाबुक्याने मारहाण केली. वाहिनीच्या डोक्याला गंभीर जखम होऊन डोक्यातून रक्तस्राव होत होता. तुम्ही भावाला का मारले असे विचारले तेव्हा तुझ्या भावाला व वहिनीला संपून टाकतो असे म्हणून धमकी दिली,’ असे फिर्यादीत म्हटले आहे.