करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरु झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. ज्वारीला सध्या क्विंटलला ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. येणाऱ्या काळात आणखी आवक वाढणार असल्याची शक्यता आहे. बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना योग्य दर देऊन त्यांचा बाजार समितीवरील विश्वास वाढवण्याचे काम केले जात आहे, असे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
सचिव क्षीरसागर म्हणाले, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी १६०० बॅग ज्वारी येत आहे. त्याला कमीतकमी 2500 तर जास्तीत जास्त 4500 व सरासरी 3500 रुपये दर मिळत आहे. कर्जत तालुक्यातील राशीन चापडगाव, परांडा तालुक्यातील काही गावे व जामखेड तालुक्यातील काही गावातून ही ज्वारी येत आहे. येथे शेतकऱ्यांची कधीही फसवणूक होत नाही. त्यामुळे या बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. येणाऱ्या काळात ही आवक वाढेल असा विश्वास त्यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना व्यक्त केला आहे.
गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळ पडला आहे. मात्र शेवटच्या क्षणी काही प्रमाणात परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे ज्वारी बऱ्यापैकी आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. नवीन ज्वारीची काढणी व मळणी सुरू झाली असून नवीन ज्वारीची आवक बाजार समितीत सुरू झाली आहे.