करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला ‘सायन्स वॊल’ उपक्रमाला बळ मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये ७५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शाळांमध्ये व्हाईट बोर्डही बसवले जाणार आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओव्हाळे यांनी नुकताच जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शिक्षण विभागासाठी ऊर्जा योजना, अमृत रसोई, खडू मुक्त शाळा व सायन्स वॊल, विद्यार्थ्यांसाठी बँच सुविधा यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यामधील सायन्स वॊल हा उपक्रम गटविकास अधिकारी राऊत यांच्या संकल्पनेतून सुरु झाला होता.
राऊत यांनी करमाळा पंचायत समितीचा पदभार घेतल्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबविण्यावर भर दिला. त्यातूनच सर्व वैज्ञानिकांची विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्ही म्हणून सायन्स वॊल उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. तेव्हा तत्कालीन सभापती अतुल पाटील यांनीही त्यांना सहकार्य केले होते. या संकल्पनेचा पंचायत समितीत जेव्हा ठराव झाला होता त्याचे सर्वात प्रथम ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने वृत्त दिले होते.
राऊत यांनी या उपक्रमासाठी मेहनत घेतली होती. सुरुवातीला लोकवर्गणीतून हा उपक्रम सुरु करून सर्व शाळांना बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर कोंढारचिंचोली येथील शाळेला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली तेव्हा या उपक्रमाचे कौतुक केले होते. दरम्यान त्यांनी संसदेतही हा विषय मांडला होता. याचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र हा उपक्रम कायम स्वरूपी सुरु राहण्यासाठी याला आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती. त्यातच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी ओव्हाळे यांनी यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा असून याकडे सकारत्मक दृष्टीने पहाणे आवश्यक आहे.