करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केलेली उमेदवारी मोहिते पाटील समर्थकांना अजिबात मान्य नाही. मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी संकटमोचक म्हणून संबोधले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी अकलूज येथे भेट घेतली. मात्र तरीही येथील जागेचा तिढा सुटलेला नसून मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुनः मतदारसंघात दौरा सुरु केला असून शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी कार्यकर्ते करत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता शितलादेवी मोहिते पाटील या देखील रिंगणात उतरल्याअसून त्यांनीही दौरा सुरु केला आहे.
माढा लोकसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे हे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते. तर भाजपकडून खासदार निंबाळकर हे उमेदवार होते. या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र पहिल्याच यादीत भाजपने निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवत नाव जाहीर केले. त्यानंतर मोहिते पाटील समर्थक नाराज झाले आणि धैर्यशील यांनी ‘तुतारी’वर निवडणूक लढवण्याची मागणी झाली. अकलूज येथे शिवरत्नवर यासाठी बैठकाही झाल्या. कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर रामराजे निंबाळकर हेच निर्णय जाहीर करतील असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगून टाकले आणि पुन्हा मतदार संघात दौरे सुरु केले.
निंबाळकर हे पाच वर्षात फक्त ठारविक व्यक्तींनाच भेटले, विरोधी गटाच्या नेत्यांना त्यांनी बळ दिले, असा आरोप करत यावेळी निंबाळकर हे निवडून येणार नाहीत, असे कार्यकर्ते म्हणत आहेत. मोहिते पाटील यांनी निंबाळकरांच्या विरुद्ध निवडणुकीत उतरावे व त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन तुतारी हे चिन्ह घेण्याची मागणी केली जात आहे. करमाळ्यात डॉ. अमोल घाडगे, अमरजित साळुंखे, ऍड. शशिकांत नरुटे, महेंद्र पाटील आदी दौऱ्यावेळी उपस्थित होते. करमाळ्यात त्यांनी सुनील सावंत यांच्या निवासस्थानी भेट दिली. फारूक जमादार, बबलू कोळेकर, दादासाहेब इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दौऱ्यानंतर आता त्यांच्या पत्नी शितलादेवी मोहिते पाटील या करमाळा दौऱ्यावर आल्या आहेत. कोंढारचिंचोली, कात्रज, टाकळी, सावडी, विहाळ, कोर्टी, दिवेगव्हाण, राजुरी, कुंभारगाव, पोन्धवाडी येथे त्या भेटी देणार आहेत.