करमाळा : सरकार एकीकडे डिजिटल पेमेंटवर भर देत आहे. तर दुसरीकडे मात्र ‘ऑनलाईन पेमेंट’ घेत नसणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे करमाळ्यात चित्र आहे. करमाळ्यात एका पेट्रोलपंपावर चक्क ऑनलाईन बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे. तर एक पंपावर पैसे दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. यातून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपासून सर्वत्र ऑनलाईन पेमेंट केले जात आहे. साधी भाजी किंवा चहाच्या स्टॊलवर देखील ऑनलाईन पेमेंट होत आहे. अशा स्थितीत करमाळ्यात पेट्रोल पंपांवर ऑनलाईन बंद असल्याचे सांगत ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावर ऑनलाईन पैसे दिल्यानंतर एटीएम प्रमाणे रोख पैसेही दिले जात होते. मात्र आता रोख पैसेही दिले जात नाहीत. एका पंपावर तर चक्क ऑनलाईन बंद असल्याचा फलक लावला आहे. याकडे प्रशासन लक्ष कधी देणार, असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.
करमाळ्यातील रिलायन्स पेट्रोल पंपावर ऑनलाईन बंद आहे. त्यामुळे येथे पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर बागल पेट्रोल पंपावर ऑनलाईन पैसे दिल्यानंतर रोख पैसे दिले नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.