करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी रविवारी (ता. १८) सकाळी ८ वाजलेपासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी ही किचकट असल्याने निकालाला उशीर होणार आहे. दुपारनंतरच चित्र स्पष्ट होईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.
मकाई साखर कारखान्याची १७ संचालकासाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र त्यातील आठ संचालक बिनविरोध झाले होते. नऊ जागांसाठी ४१ मतदान केंद्रावर मतदान झाले आहे. या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात होते. यातील चार उमेदवार हे बागल गटाचे येणार आहेत. फक्त ते कोणते असतील ते निकालानंतर समजणार आहे. बाकीचे पाच उमेदवार हे एकास एक असणार आहेत. त्यामुळे निकालाची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. हे मतदान मतपत्रिकेवर फुली मारून झाले आहे. त्यामुळे त्याची मोजणी करायला वेळ लागणार आहे.
अशी असेल मतमोजणी
मतमोजणीसाठी 20 टेबल ठेवण्यात आले आहेत. तीन फेऱ्यात ही मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत 20 टेबलवर 20 मतदान केंद्राच्या मतपेट्या घेतल्या जातील. त्यानंतर मतपत्रिका वेगळ्या करून त्याची मतमोजणी केली जाईल. पहिली फेरी झाल्यानंतर कोण आघाडीवर आहे हे समजू शकणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीत 21 ते 40 पर्यंतच्या मतदान केंद्रावरील मतपेट्या घेतल्या जातील. त्यावरील मतदान मोजणी झाल्यानंतर बाळेवाडी येथील 41 क्रमांकाची 1 नंबर टेबलवर मतमोजणी होईल. त्यांतर निकाल समजणार आहे.
पहिल्या फेरीत भिलारवाडी, कात्रज, टाकळी, सावडी, कुंभारगाव, खातगाव, भगतवाडी, रामवाडी, पारेवडी, केत्तूर, राजुरी, वाशिंबे, उमरड, उंदरगाव, उंदरगाव, झरे, चिखलठाण, चिखलठाण, शेटफळ व शेटफळ या क्रमशा मतदान केंद्राची क्रमशा 1 ते 20 ये टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यांनंतर याच टेबलवर दुसऱ्या फेरीत कुंभेज, फिसरे, हिवरे, साडे, वरकटणे, वांगी 1, वांगी 3, शेलगाव वा, कंदर, कंदर, केम, सालसे, मांगी, वडगाव, हिवरवाडी, रावगाव, वीट, करमाळा, पोंथरे व करंजे या मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे. शेवटी तिसऱ्या फेरीत एकमेव बाळेवाडी या मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे.