करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मान्यता दिली आहे. ही योजना सुरु झाल्यानंतर २९ गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याशिवाय टँकर सुरु असलेल्या गावात टँकर भरण्यासाठी मोठी मदत होणार आहे, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
गेल्यावर्षीचा पावसाळा अक्षरशः कोरडा गेला होता. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टँकर सुरु करण्यासाठी जलस्त्रोतही आठले आहेत. त्यामुळे उजनी धरणावरून २९ गावांसाठी पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दुरुस्त झाल्यास पाणी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी समक्ष पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार दुरुस्तीसाठी २४ लाख ९६ हजार ७१२ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजना दुरुस्तीचे काम सुरू झाले असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.
आमदार शिंदे म्हणाले, तालुक्यातील पाणी प्रश्न महत्त्वाचा असून या संदर्भात उजनी धरण मायनसमध्ये जाईपर्यंत आपण दहिगाव उपसा सिंचन योजना चालवली. त्या माध्यमातूनही काही गावातील पाणी प्रश्न दोन- तीन महिन्यापर्यंत सुटला होता. उजनी धरण अवघे ६० टक्के भरल्यामुळे दहिगाव योजना जानेवारी २०२४ मध्येच बंद पडल्यामुळे एप्रिलपासून दहिगाव उपसाच्या पट्ट्यामध्ये दुष्काळाने उग्ररूप धारण केलेले आहे. त्यामुळेच आपण जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करणे संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला तसेच चर्चाही केली. ही योजना सुरू होणार असल्यामुळे टँकरसाठी फिडर पॉईंटही उपलब्ध होतील.