अशोक मुरूमकर
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही नाव त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. निंबाळकर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक नाराज झाले आणि त्यांनी संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश करून ‘तुतारी’वर लढावे, अशी आग्रही मागणी होऊ लागली. त्यानंतर मोहिते पाटील यांच्या बाजूने चांगले वातावरणही निर्माण होऊ लागले मात्र अजूनही त्यांनी ‘निर्णय’ घेतलेला नाही. मोहिते पाटील निर्णय घेईला का वेळ लावत आहेत यावरून राजकीय वर्तुळात काही शक्यता वर्तवल्या जात आहेत.
१) माढा लोकसभा मतदारसंघात खासदार निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत झाली तर हा सामना अतिशय चुरशीचा होऊ शकतो. निंबाळकर यांच्यावर असलेल्या नाराजीचा फायदा मोहिते पाटील यांना होऊ शकतो. मोहिते पाटील पाटील यांनी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्याचा त्यांनी कानोसाही घेतला आहे. मात्र ते आता निर्णय घेण्यासाठी का वेळ लावत आहेत. यावरून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. निंबाळकर यांच्यावरील नाराजीचा फायदा या निवडणुकीत मोहिते पाटील यांना झाला तर ते खासदार होतीलही मात्र पुढे काय हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.
२) राज्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो. ग्रामीण भागात चौकाचौकात रंगलेल्या गप्पावरून हे दिसते. पवार व ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती आहे, मात्र देशातील भाजप सरकार बदलेले एवढ्या जागा त्यांच्या येऊ शकतात का? जर त्यांच्या जागा जास्त आल्या नाही तर मोहिते पाटील खासदार झाले तरी पुढे काय करायचे? हा एक प्रश्न भाजप सोडताना त्यांच्यापुढे असावा, अशी दुसरी शक्यता वर्तवली जात आहे.
३) भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार निंबाळकर यांच्याविरुद्ध बंड केले तर आमदारकीचे काय? असाही एक प्रश्न त्यांच्यापुढे असावा. शिवाय मोहिते पाटील यांच्या सहकारी संस्थांना भाजपने मदत केलेली आहे. बंड केले तर त्या संस्था पुन्हा अडचणीत येतील का? किंवा काय कारवाई केली जाऊ शकते का? याची भीती असल्याची एक शक्यता वर्तवली जात आहे.
४) मोहिते पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तर पुढे विधानसभा निवडणुकीची समीकरणे कशी असतील हेही निश्चित करून घेतले जाऊ शकते. त्यामुळे सर्व ठरवूनच मोहिते पाटील हे निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
५) मोहिते पाटील यांनी लोकसभा लढवणे ही कार्यकर्त्यांची जशी इच्छा आहे. तशी मोहिते पाटील गटाचीही गट टिकविण्याच्या दृष्टीने गरज आहे. मोहिते पाटील गट हा संपुर्ण जिल्ह्यात आहे. एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे राजकारण मोहिते पाटील यांच्या हातात होते. हा पुन्हा आणायचा असेल तर त्यांनी आता निर्णय घेणे आवश्यक आहे, असे बोलले जात आहे. मात्र त्यांचा अद्याप निर्णय होत नाही. मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेटही घेतल्याचे माध्यमात चर्चा आहे. याबाबत अतिशय गोपनीयता ठेवली जात आहे. हा गोपनीयता आणि निर्णय यावरून अनेक चर्चा रंगत आहेत.
असेही असू शकते?
मोहिते पाटील यांच्याच उमेदवारीवरून गेल्या लोकसभा निवडणुकीत माढ्यात वेगवेगळ्या चर्चा होत्या. शेवटी मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यांनी भाजपचे खासदार निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले होते. आता या निवडणुकीत मोहिते पाटील हे भाजपला सोडून शरद पवार गटात येत असतील तर त्यांच्यात नेमक्या काय चर्चा झाल्या हे समजू शकत नसले तरी अशी एक चर्चा आहे, ती म्हणजे गेल्यावेळी उमेदवारीवरूनच ‘तुम्ही राष्ट्रवादी सोडली आणि निंबाळकर यांचे काम केले. आता यावेळी आम्ही जो उमेदवार देत आहोत, त्यांच्यासाठी तुम्ही काम करा. येणाऱ्या काळात तुम्हाला चांगली संधी दिली जाईल’, असे सांगितले जात असेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.
वातावरण बदलत आहे का?
निंबाळकर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली आणि ‘तुतारी’ समोर येऊ लागली. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनीही त्यांची भेट घेतली. जयसिंह उर्फ बाळराजे मोहिते यांनीही ‘तुतारी’चा संकेत दिला. त्यानंतर मोहिते पाटील यांच्याबाजूने वातावरण झाले. मात्र निर्णय घेण्यासाठी वेळ लागत असल्याने उत्सुकता वाढत असून वातावरणही आणखी बदलत असल्याचे दिसत आहे.
शरद पवार गटाकडून अभयसिंह जगताप, अनिकेत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचेही नाव चर्चेत आहे. माढ्यातून उमेदवारी कोणाला मिळणार हे पहावे लागणार आहे. त्यानंतर येथील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपचे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा प्रचारही सुरु आहे.