करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यात सध्या तरुणांच्या लग्नाचा विषय गाजत आहे. देशभर यांच्या बातम्या होत आहेत, मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही. मात्र मी खासदार झाल्याबरोबर तरुणाच्या लग्नाचा विषय संसदेत मांडणार आहे. त्यासाठी एक चांगला कायदा करण्यासाठी प्रयत्न करील, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बारस्कर यांनी करमाळ्यात पत्रकारांशी बोलताना दिले आहे.
पत्रकार परिषदेवळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळ, युवाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, जिल्हा संघटक वामन अडसूळ, महासचिव प्रविण वाघमारे, जालिंदर गायकवाड, शहर अध्यक्ष विशाल लोंढे, विलास कांबळे, तालुकाध्यक्ष नवनाथ साळवे, उपाध्यक्ष अजय पवळ, नंदू कांबळे, युवाचे तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे, गणेश कांबळे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवाजी बनकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे आण्णासाहेब सुपनवर, महावीर पोळ, सचिन घोडके, लक्ष्मण भालेराव, संतोष पोळ, संभाजी कांबळे आदी उपस्थित होते.
बारस्कर म्हणाले, सध्या बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे तरुण तणावात आहेत. बेरोजगारी असल्यामुळे तरुणांशी मुली लग्न करण्यास नकार देत आहेत. व्यसनाधीनता वाढत आहे. ‘उडता पंजाब’ हा एक चित्रपट आला होता तसा वेळीच लक्ष दिले नाही तर व्यसनाधीनतेमुळे ‘उडता महाराष्ट्र’ होण्याला वेळ लागणार नाही. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मी खासदार झाल्यानंतर तरुणांच्या लग्नाचा विषय संसदेत मांडणार आहे. सध्या लग्नाच्या वयाची यात २१ वर्षाची आहे. मात्र ३५ वर्ष झाले तरी अनेकांचे विवाह झालेले नाहीत. शेतकऱ्याशी मुली विवाह करण्यास नकार देत आहेत. कारण शेतीला हमी भाव नाही, सततचे दुष्काळ व अवकाळी यामुळे त्यांच्यापुढे मोठे संकट उभा राहत आहे. हा मुद्दा मी संसदेत मांडून शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीच्या नावे सरकारी बँकेत ‘२५ लाखाची एफडी’ असा नियम केला जाईल’, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची खरी लढत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशीच होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना ते म्हणाले, या मतदारसंघात आम्हाला चांगले वातावरण आहे. यावेळी आमची लढत ही राष्ट्रवादीशी होणार आहे. भाजपचे निंबाळकर यांनी कोणतेही काम केलेले नाही. ‘ईडी’, ‘सीबीआय’चा धाक दाखवून भाजप दबाव आणत आहे. मात्र निवडणुकीत मतदार त्यांना जागा दाखवेल.
पुढे बोलताना ते म्हणाले, माढा मतदारसंघातील माळशिरस व फलटण हे विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. हे सांगतानाच बारस्कर यांनी या मतदारसंघातील जातीय समीकरण ही स्पष्ट करून सांगितले आहे. प्रस्थापितांच्या विरुद्धची ही लढाई असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना हमी भाव देण्याच्यावेळी हे सर्व एकत्र बसून निर्णय घेतात, मात्र शेतकऱ्यांना चांगला भाव देत नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.