करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर असून ‘शेकाप’चे अनिकेत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, अभयसिंह जगताप यांची नावे चर्चेत आहेत. मोहिते पाटील यांचा अजून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झालेला नाही, मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम असल्याचे दिसत असून त्यांच्या गावभेट दौऱ्याचा धडाका सुरूच आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील समर्थक यांच्यात नाराजी आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र त्यांना भाजपकडून डावललेले. ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांनी संपुर्ण मतदारांघात दादर दौरा केला होता. त्यानंतर समर्थकांनी त्यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांच्याशी त्यांची भेट झाल्याचीही माहिती आहे.
दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दुसरी यादी जाहीर केली त्यात मोहिते पाटील यांचे नाव येईल, अशी शक्यता होती. मात्र त्यांचे नाव आले नाही. त्यांच्या निर्णयासाठी का? वेळ लागत आहे, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच त्यांनी पुन्हा दौरे सुरु केले असल्याचे समजत आहे. सोशल मीडियावर ते आज करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे येणार असल्याचे समजत आहे.