पुणे : प्लास्टिक हे पृथ्वीला लागलेले ग्रहण असून ते सोडविण्यासाठी युवा विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. प्लास्टिकची समस्या सोडविण्यासाठी आयोजित विशेष स्पर्धेला भारतीय विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित या विशेष स्पर्धेचे विजेते पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Kemkar-I-Cair-2-1024x738.jpg)
येथील ग्रीन तेर फाऊंडेशनच्या पुढाकाराने पर्यावरण संरक्षणासाठी नेट झिरो ही संकल्पना उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबविली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचलनालय (एआयसीटीई) आदींच्या सहयोगाने शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत. येत्या २२ एप्रिल रोजी जगभरात वसुंधरा दिन साजरा होत आहे. यानिमित्त विशेष राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयआयटी, आयआयएम, एनआयटी यसह अनेक नामांकीत संस्थांमधील तब्बल ६०० हून अधिक युवा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत दोन टप्प्यामध्ये परीक्षा घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना १५ मिनिटात २५ प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहेत. यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र असतील. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या संदर्भातील काही समस्यांचे विषय दिले जातील. विद्यार्थी त्याचा अभ्यास करुन सादरीकरण (पीपीटी) तयार करतील. त्यानंतर ते ऑनलाईन पद्धतीने जमा करतील. फाऊंडेशनचे संस्थापक संचालक आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ नेट झिरो मोहिमेचे मार्गदर्शक इरिक सोल्हेम आणि फाऊंडेशनच्या समन्वयक आर्किटेक्ट दुर्गा कामत या तिघांची समिती विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण करेल. तीन विजेत्यांची त्यातून निवड केली जाणार आहे. प्रथम विजेत्या विद्यार्थ्याला ४ हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र तर उपविजेत्या दोन स्पर्धकांना १ हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेसच्या साक्षी पटेल आणि नरेश साहू हे परीश्रम घेत आहेत.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Matosrhi-2-2-1024x606.jpg)
नेट झिरोचे मुख्य उद्दीष्ट
मानवनिर्मित कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्णपणे थांबविण्यासाठी नेट झिरो ही महत्वाकांक्षी मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील ५००हून अधिक विद्यापीठे, शेकडो महाविद्यालये, आयआयटीसारख्या नामांकीत संस्था सहभागी झाल्या आहेत. याद्वारे देशातील जवळपास १ लाख विद्यार्थी पर्यावरण संरक्षणासाठी सज्ज होत आहेत.
यंदाचे घोषवाक्य
यंदाच्या वसुंधरा दिनाचे घोषवाक्य (थीम) प्लास्टिक विरुद्ध ग्रह (प्लॅनेट) असे आहे. त्यानिमित्त प्लास्टिकवर आधारीत ही स्पर्धा घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यातील प्रश्नमंजुषा ही अतिशय आव्हानात्मक अशी आहे. तसेच, सिंगल युज प्लास्टिकचा प्रश्न सोडविण्यासाठी दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मुख्य मार्गदर्शक सोल्हेम हे प्लास्टिक योद्धा म्हणून ख्यात आहेत. त्यांच्यामुळेच प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि त्यावर बंदी घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर आता संयुक्त राष्ट्रात वाटाघाटी सुरू आहेत.
नेट झिरोच्या माध्यमातून ही पहिलीच स्पर्धा घेतली जात आहे. त्यास उदंड प्रतिसाद लाभलेला पाहून यापुढील काळात अधिक नाविन्यपूर्ण स्पर्धा, उपक्रम राबविले जातील. तरुणांना पर्यावरणाप्रती अधिक आस्था आहे हे सुद्धा स्पष्ट झाले.
- डॉ. राजेंद्र शेंडे, संस्थापक संचालक, ग्रीन तेर फाऊंडेशन