करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, तहसील कार्यालय व ग्रामपंचायत गौंडरे यांच्या वतीने गौंडरेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य संभाजी किर्दाक आदी उपस्थित होते.
गौंडरेत रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंतच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाच्या मताचे मोल अनमोल असते. यासाठी सर्व ग्रामस्थांनी १०० टक्के मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी दोन्ही हात वर करून मतदान करण्याचे अभिवचन दिले.
या लोकशाहीच्या उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण गावात स्वच्छता अभियान , मतदान जनजागृती व्याख्याने यांच्या माध्यमातून ग्रामस्थांचे प्रबोधन केले जाणार आहे. तसेच मतदानादिवशी प्रत्येक कुटुंब लोकशाहीची गुढी उभारून लोकशाहीचा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे . या ठिकाणचे मतदान केंद्र ही आदर्श मतदान केंद्र निर्माण केले जाणार आहे तसेच यावेळी गावातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन पोलिस पाटील वसुंधरा अभियानाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.