करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा निवडणुकीचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेदरम्यान चिखलठाण येथे नागरिकांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले होते. त्यावर आमदार संजयमामा शिंदे यांनी हा रस्ता मंजूर झाला असून आचारसंहितेनंतर मार्गी लागेल असे स्पष्ट केले होते. सभा झाल्यानंतर निंबाळकर यांना घेरण्याचाही प्रयत्न करत ‘काम नाही तर मत नाही, अशी घोषणा देण्यात आली होती.’ त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत प्रश्न करण्यात आला होता. मात्र आता आमदार शिंदे यांच्या समर्थकांकडून टेंडर प्रक्रियेचा पुरावा सादर करत स्पष्टीकरण दिले आहे.
जेऊर, शेटफळ, चिखलठाण व कुगावला दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याने जाणे- येणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याचे काम त्वरित पूर्ण होणे आवश्यक आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून नागरिकांचा पाठपुरावाही सुरु आहे. त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधीही या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा नेत्यांकडे करत आहेत. मात्र तरीही रस्ता होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यातूनच ‘काम नाही तर मत नाही’, अशी घोषणा देण्यात आली होती. आमदार शिंदे यांनी हा रस्ता मंजूर झाला असल्याचेही सांगितले होते. तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमठत होत्या, अखेर शिंदे गटाने याचा पुरावाच सादर केला आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे म्हणाले, हा रस्ता होणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी या भागातील सर्व ग्रामपंचायीतने ठराव देखील दिले होते. मी सरपंच असताना आमदार शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार शिंदे यांनी निधीही उपलब्ध करून दिला. त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यानंतर काही ठिकाणी कामही झाले. राहिलेले कामही पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही सर्व कटिबंध आहोत. राहिलेले काम करण्यासाठी टेंडर प्रक्रियाही सुरु आहे. मात्र आचारसंहितेमुळे हे काम करण्यास अडचणी आल्या. शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय काम सुरु करता येत नाही, नागरिकांचा प्रश्न महत्वाचा आहेच. मात्र काही गोष्टी समजूनही घेणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्हीही स्वस्थ बसणार नाहीत, कारण याच रस्त्याने आम्हालाही ये- जा करावी लागते. त्यामुळे कोणीही कसलाही गैरसमज करून टीकाटिपणी करून नये, असे आवाहन सरडे यांनी केले आहे.