करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (शरद पवार गट) शरद पवार हे आज (शुक्रवारी) करमाळा दौऱ्यावर आले होते. माजी आमदार नारायण पाटील यांनी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का दिला आहे. यावेळी माढा लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभाही झाली. या दौऱ्यादरम्यान पाटील गटाचे समर्थक व नुकताच शिंदे गटाच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेल्या देवानंद बागल यांनी पवार यांचे सारथ्य केले.
पवार यांच्या दौऱ्यानिमित्त मोहिते पाटील समर्थक, पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. सभेसाठी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान निवडण्यात आले होते. तर पवार यांचे हेलिपॅड यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे होते. हे अंतर साधणार दोन किलोमीटर आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणे करमाळा शहाराची टोके आहेत. हेलिपॅडवरून पवार हे सभेच्या ठिकाणापर्यंत कारने आले. या गाडीचे स्टेरिंग बागल यांच्या हाती होते.
पावर हे करमाळ्यात बरोबर दिलेल्या वेळेत आहे. त्यानंतर हेलिपॅडवरून बाजार समिती येथे येऊन देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून काही अंतरावरच असलेल्या सभेच्या ठिकाणी ते आले. सभा संपल्यानंतर नगर बायपासने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले. तेथून ते यशवंतराव चव्हाण येथील हेलिपॅडवर मौलाली माळ मार्गे बायपासने हेलिपॅडवर गेले.
हेलिपॅडवरून निघाल्यापासून हेलिपॅडवर येईपर्यंत पवार यांचे सारथ्य देवानंद बागल यांनी केले. शरद पवार हे गाडीत त्यांच्याच बाजूला समोरच्या सीटवर बसले होते. बागल हे माजी आमदार पाटील यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. शिवसेनेतील गटबाजीला कंटाळून त्यांनी काही दिवसापूर्वीच राजीनामा दिला होता. शिवसेनेत असतानाही ते पाटील यांचा आदेश अंतिम मानत होते. माजी आमदार पाटील हे देखील मोहिते पाटील यांचे समर्थक आहेत. शिवसेनेत असतानाही त्यांनी मोहिते पाटील यांचा शब्द प्रमाण मानूनच काम केले आहे. ‘देशाचे नेते पवार यांचे सारथ्य करण्याचे भाग्य आज मिळाले’, असल्याची भावना बागल यांनी ‘काय सांगता’शी बोलताना व्यक्त केली आहे.