करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार अतिशय सूक्ष्मपणे सुरु आहे. मतदानादिवशी कोणताही दगाफटका होऊ नये याचे नियोजन सुरु आहे. गावागावातून नागरिकांची चर्चा वेगेळी असली तरी सुद्धा ते वातावरण बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांनी गावभेट दौरा करून कार्यकर्त्यांना सूचना देण्याचे काम सुरु केले आहे. यामध्ये आमदार शिंदे यांनी केलेले विकास काम हा निंबाळकरांसाठी प्लस पॉईंट ठरत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील व भाजपचे खासदार निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीत स्थनिक प्रश्न, देशपातळीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, कोरोना काळातील मोदींचे काम या मुद्द्यावर प्रचार सुरु आहे. याशिवाय आतापर्यंतच्या खासदारांपैकी सर्वात जास्त जनसपंर्क असलेले निंबाळकर हे खासदार असल्याचेही सांगितले जात आहे.
भाजपने निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील समर्थक नाराज झाले होते. त्यानंतर येथील उमेदवारी बदलण्याची मागणी केली होती. मात्र भाजपने निंबाळकर यांची उमेदवारी कायम ठेवली आणि प्रचार सुरु केला. महायुतीमधील घटकपक्ष राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांच्यासह रासप, आरपीआय (ए), रयत क्रांती हे सर्व कामाला लागले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकत्रित बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचनाही केला. तरीही नाराजीचा सूर कायम होता. मात्र हा ही नाराजी थांबवण्यासाठी आमदार शिंदे यांनी केलेली विकास कामे निंबाळकरांच्या मदतीला येऊ शकतात. आणि त्याच दृष्टीने आमदार शिंदे यांनी जनसंपर्क वाढवून काम सुरु केले असल्याचे दिसत आहे.
आमदार शिंदे यांनी सुरुवातीला पश्चिम भागातील कोंढारचिचोली, कात्रज, टाकळी, हिंगणी, पोमलवाडी, सावडी भागात भेटी देऊन कार्यकर्त्यांशी सवांद साधला. या भागातील सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे यांच्या म्हणण्यानुसार आमदार शिंदे यांच्या दौऱ्यामुळे येथे फरक पडला आहे. त्यांनी या भागातील सर्वात महत्वाचा असलेला डिकसळ पुलाचा विषय मार्गी लावलेला आहे. याचा परिणाम होणार आहे. आमदार शिंदे यांच्या माध्यमातून रस्ता, वीज हे प्रश्नही मार्गी लागलेले आहेत. त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.
आमदार शिंदे यांचे समर्थक सरपंच तानाजी झोळ यांच्या म्हणण्यानुसार आमदार शिंदे यांच्यामुळे बहुचर्चित जातेगाव- टेंभुर्णी या महामार्गाला राज्य सरकारकडून एनओसी मिळाली. या महामार्गाचे काम लवकरच होईल. आमदार शिंदे यांनी करमाळा तालुक्यात केलेल्या विकास कामामुळे निंबाळकर यांना फायदा होणार आहे. मांगी येथील सुजित बागल यांच्या म्हणण्यानुसार आमदार शिंदे यांनी तालुक्यात विजेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून वीज उपकेंद्रांना पाठपुरावा करून मंजुरी मिळवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांना अनेक कामे करायची आहेत. त्यामुळे आमदार शिंदे यांना बळ देण्याची गरज आहे. त्यातूनच आम्ही गावागावातील कार्यकर्त्यांना या निवडणुकीत निंबाळकर यांच्या मागे उभा राहण्याचे आवाहन करत आहोत. दहिगाव उपसा सिंचन, उजनी कुकडी सिंचन योजना, करमाळा शहरातील कामासाठी दिलेला निधी व गावागावात दिलेली विकास कामे या देखील जमेच्या बाजू आहेत.