करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. त्यामुळे बागल गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. याचा फायदा भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना होणार आहे.
करमाळा तालुक्यातील राजकारणात बागल गट हा एक प्रमुख गट आहे. मात्र कारखान्यामुळे हा गट अडचणीत आला होता. मकाई सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांचे ऊस बिल थकल्यामुळे नेत्यांना विरोधकांकडून टार्गेट केले जात होते. अशा स्थितीतही बागल गटाच्या समर्थकांनी निवडणुकीत कारखाना बागल गटाच्या ताब्यात दिला होता. कारखान्याचे थकीत पैसे मिळावेत म्हणून बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे प्रयत्न करत होते. यासाठी अनेक आंदोलनेही झाली होती. अशा स्थितीत बागल गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. त्यामुळे पैसे मिळतील अशी अशा निर्माण झाली होती, आणि ती अपेक्षा अखेर पूर्ण झाली आहे. याचा फायदा माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला होणार आहे.
करमाळा तालुक्यात बागल गट हा अडचणीत असला तरी निर्णायक भूमिकेत राहील असे चित्र आहे. रश्मी बागल व दिग्विजय बागल हे निंबाळकरांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभांना त्या मंचावर होत्या. दिग्विजय बागल हे देखील गावागावात जात कार्यकर्त्यांना भेटत आहेत. मकाईचे बिल जमा होण्यापूर्वी त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास अडचण येत होती. त्यांच्या सांगण्यावर देखील अनेकदा प्रश्न चिन्ह निर्माण केले जात होते. मात्र आता प्रत्यक्ष पैसे जमा झाले आहेत.
‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने याचे पुरावे हाती घेतले आहेत. जिल्हा बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे पैसे जमा देखील झाले आहेत. राष्ट्रीकृत बँकांचे देखील लवकरच पैसे जमा होतील. सुट्यांमुळे पैसे जमा होण्यास अडचण होत आहे. कारखान्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गाळप हंगाम २०२२- २३ मधील उसाला पंढरपूर अर्बन बँकेत प्रती टनाला २३०१ रुपयेप्रमाणे १ कोटी ५३ लाख १९ हजार २०३ रुपये जमा केले आहेत. यांच बँकेच्या दुसऱ्या शाखेत २ कोटी १५ लाख १६ हजार १९१ रुपये जमा केले आहेत. कारखान्याकडे साधारण १ हजार ६०० शेतकऱ्यांचे २६ कोटी रुपये देणे राहिले होते. तेवढे पैसे उपलब्ध झाले आहेत. सर्व बँकांच्या याद्या करून बँकांकडे बिल वितरणासाठी देण्याची प्रक्रिया सुरु आहे, असे कखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी सांगितले आहे.