करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा निवडणुकीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी दिवसात काल (शुक्रवारी) १४ गावांना भेट दिली आहे. शेलगाव (वा), भाळवणी, पांगरे, कविटगाव, सांगवी (बिटरगाव), सातोली, वडशिवणे, मलवडी, निंभोरे, घोटी, वरकुटे, नेरले, आवाटी, गौंडरे या गावांना त्यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.

माजी आमदार पाटील म्हणाले, करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई, वीज कपात, कांदा निर्यात, रेल्वे, रस्ते या प्रश्नांवर भर देत मतदारांसमोर विकासाचे वास्तव मांडले. २०१४ ते १९ मधील आपल्या हातुन झालेली विकासकामे सांगितली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला आहे. अनेक गावात इतर गटातील कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय होणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

नेरले येथील काकासाहेब पाटील, बाळासाहेब काळे, महेश अंधारे यांनी बागल गटास तर गणेश काळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या प्रचार दौऱ्यात माजी सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, केमचे अजित तळेकर यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. आज माजी आमदार पाटील यांचा माढा तालुक्यातील ३६ गावातील मतदारांशी संवाद होणार असून लोणी, मुंगशी, नाडी, शिंगेवाडी, कव्हे, महादेववाडी, गवळेवाडी, बारलोणी, अकुलगाव, लहू, चिंचगाव, तडवळे, तांदुळवाडी, सापटणे, शिंदेवाडी आणि घाटणे या गावांना भेटी दिल्या जाणार आहेत. माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या दौऱ्यात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून सर्वत्र तुतारीमय वातावरण निर्माण झाले आहे.
