करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तुमच्या अस्मितेला कोण धक्का लावत असेल तर तुम्ही ९० टक्के मतदान करून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करा’, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलठण येथे केले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सांगता सभेवेळी ते फलठण येथे बोलत होते. या मतदारसंघात मंगळवारी (ता. ७) मतदान होणार आहे. येथे महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविरुद्ध महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात खरी लढत होत आहे. या मतदारसंघात दोघांकडूनही जोरदार प्रचार झाला आहे. फलठण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने निंबाळकर यांच्या सभेने प्रचार सांगता झाली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, निंबाळकर हे फलठणसह संपूर्ण मतदारसंघावर प्रेम करत आहेत. माळशिरसकर हे त्यांच्या उमेदवाराला लीड देणार असतील तर तुम्हीही तुमची अस्मिता जपा आणि ९० टक्के मतदान करा. निंबाळकर हे पाणीदार खासदार झाले आहेत. त्यांच्यामुळे हा तालुका दुष्काळमुक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी त्यांना खासदार करणे आवश्यक आहे. सांगोला, माढा, करमाळा, माण, माळशिरस व फलठणचा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. रेल्वे, पाणी, रस्ता व सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी त्यांनी काम केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, निंबाळकर यांनी पाच वर्षात चांगले काम करून प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुतारीची पिपाणी करायची आहे. निंबाळकर यांच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागात जावे म्हणून ४ हजार कोटींची फ्लड डायव्हेशन योजनेला मंजुरी दिली आहे. आम्ही जे सांगितले ते करून दाखवले आहे. त्यासाठी आमचे प्रगती पुस्तक पहा. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासासाठी मोदींचे सरकार येणे आवश्यक आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.