करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील पोथरे व बिटरगाव श्री परिसरात वादळी वारे व पाऊस झाल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. तीन दिवसांपासून हा परिसरात अंधारात आहे. काही ठिकाणी शेतातील वीज सुरु आहे तर काही ठिकाणी गावठाण बंद आहे. त्यामुळे नागरिकांचे मोबाईल डिस्चार्ज झाले आहेत. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज सुरळती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र वीज सुरु न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पोथरे व बिटरगाव श्री येथे गावठाणसाठी मांगी वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. या या भागात शेतीला काही ठिकाणी पोटेगाव तर काही ठिकाणी मांगीतून वीज मिळते. तीन दिवसांपूर्वी वादळी वारे झाले होते तेव्हापासून येथील वीज गायब झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी थोडावेळ वीज आली मात्र पुन्हा नऊ वाजताच्या सुमारास वादळी वारे सुरु झाल्याबरोबर वीज गायब झाली. त्यानंतर रात्रभर अंधार होता. पुन्हा सकाळी वीज आली मात्र दुपारी ३ वाजता पाऊस सुरु झाल्याबरोबर वीज गायब झाली ती अजूनही आलेली नाही. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. मात्र पावसाळ्यापूर्वी या भागातील दुरुस्तीची कामे करून पावसाळ्यात वीज सुरळती देणे आवश्यक आहे. सततचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.