करमाळा (सोलापूर) : येथील क्षितिज ग्रुपच्या वतीने परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी शमा बोधे सिस्टर व ढाकणे सिस्टर यांचा सन्मान करण्यात आला. दिपप्रज्वलन आणि फ्लोरेंस नाइटिंगेल ह्यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुष्पा फंड, माधुरी परदेशी, सुप्रिया येवले, मंजू देवी आणि नलिनी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
12 मे हा फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. फ्लोरेंस नाइटिंगेल यांनी आधुनिक नर्सिंग व्यवसायाचा पाया रचला आणि संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी समर्पित केले. या दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. शमा बोधे यांनी क्षितिज ग्रुपचे आभार मानले. ढाकणे सिस्टर यांनी त्यांचे अनुभव सांगितले तसेच फ्लोरेंस नाइटिंगेल यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करत रुग्णसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. सुनिता दोशी यांनी प्रास्तविक केले तर स्वाती माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सुजाता मेहता यांनी उपस्थितांचे आभार मानले.