करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील लिंबेवाडी येथे बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. खरीप हंगामातील विविध पिकांचे तांत्रिक मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.
बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम, घरगुती बियाणे व इतर बियाण्यासाठी उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक मोहीम, हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक मोहीम, खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रशिक्षण मोहीम व जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत वापर प्रात्यक्षिक मोहीम व घरगुती बियाणे उगवणशक्ती क्षमता तपासणी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी अधिकारी ए. एस. चव्हाण, कृषी पर्यवेक्षक एस. जी. गायकवाड, कृषी सहायक दादासाहेब नवले, विजय सोरटे व शेतकरी उपस्थित होते. चव्हाण यांनी बीज प्रक्रिया म्हणजे काय? बीज प्रक्रियेचे फायदे? जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया यामध्ये काय काळजी घ्यावी? जसे की जिवाणू संवर्धक लावण्यापूर्वी बियाण्यास कीटकनाशके बुरशीनाशके इत्यादी लावलेले असेल तर जिवाणू संवर्धके नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे, तसेच ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकासोबत रायझोबियम, ऑझोटोबॅक्टर, स्पुरद विरघळणारे जिवाणू या जिवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करता येते, बीजप्रक्रिया करण्याचा क्रम जसे की सर्वात आधी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी यानंतर रासायनिक किटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी यानंतर तीन ते चार तासांनी रायझोबियम/ ऑझोटोबॅक्टर यांची बीजप्रक्रिया करावी व सर्वात शेवटी स्पुरद विरघळणाऱ्या जिवाणूची बीजप्रक्रिया करावी यावर मार्गदर्शन केले. एस. जी. गायकवाड व विजय सोरटे यांनी बीज प्रक्रिया व दादासाहेब नवले यांनी उगवण शक्ती यावर प्रात्यक्षिक करण्यासाठी उपस्थित शेतकऱ्याना मार्गदर्शन केले.