करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात विद्युतपंप काढण्यासाठी चुलता व चुलत भावाबरोबर गेलेल्या १७ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ऋषीकेश बाळासाहेब वारगड (रा. रामवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या या मुलाचे नाव आहे. त्याने बारावीची परीक्षा दिली होती. त्याचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून त्याला विज्ञान शाखेत ७५ टक्के गुण मिळाले होते.
उजनी धरणात सध्या वजा 60 टक्के पाणी आहे. दोन दिवसात जून महिना सुरू होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पावसाळा सुरू होणार असल्याने भीमा नदीसह काही ठिकाणी असलेल्या छोट्या बंधाऱ्यांची दारे काढली जात आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पाणी कमी झाल्यामुळे लांबपर्यंत नेलेले विद्युतपंप काढण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू आहे. त्यातच आज (बुधवारी) वारगड हे विद्युतपंप काढण्यासाठी गेले होते.
रामवाडी परिसरात रेल्वे प्रशासनाकडून पुलाचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी त्यांनी भराव टाकला आहे. त्यामुळे या परिसरात पाणी जास्त तुंबले होते. त्यात प्रवाह वाढला होता याचा आंदाज ऋषीकेशला लागला नसल्याने तो बुडाला अशी चर्चा या परिसरात सुरू आहे. मृत्यू झालेल्या वारगडला आई- वडील व एक छोटा भाऊ आहे. चुलता व चुलत भाऊ हे तुंबलेल्या पाण्यातून पोहोत जात होते. तेव्हा त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार फक्त 20 फुट तो पोहोत आला असता तर त्याचा जीव वाचला असता. त्याला वाचवणीसाठी चुलता व भावाने प्रयत्न केले. आणि त्याला बाहेर ही काढले, त्यानंतर त्याला भिगवण येथील रुग्णालयात दाखलही केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हा प्राशसनाचा निष्काळजीपणाचा बळी असल्याचा आरोप
उजनीच्या पाण्याचे यावेळी योग्य नियोजन झाले नाही. त्यामुळे मोठ्याप्रमाणात खाली पाणी सोडल्याने पणीपातळी खाली गेली आहे. शेतकरी पिके जगवण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळेच ही दुर्घटना घडली असून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात. कुगाव ते कळाशी बोट दुर्घटना ताजी असतानाच पुनःही दुर्घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.