करमाळा (अशोक मुरूमकर) : स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी एकीकडे सरकार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मात्र करमाळा तालुक्यात सहा वर्षात तीन योजनांमधील ४३ मंजूर झालेली घरे रद्द करण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे. दोन योजनांमध्ये करमाळा प्रशासनाने दमदार काम केले असून अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह तहसीलदार शिल्पा ठोकडे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचेही योगदान महत्वाचे आहे.
‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना गटविकास अधिकारी राऊत म्हणाले, ‘करमाळा तालुक्यात २०१६ पासून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३ हजार ७६८ घरकुले मंजूर झाली होती. त्यातील ३ हजार १७१ घरकुले पूर्ण झाली आहे. ५६८ घरकुले अपूर्ण असून २९ लाभार्थ्यांची घरकुले रद्द झाली आहेत. १८ घरकुलाचा पहिला हप्ता बाकी आहे. अपूर्ण घरांपैकी ११५ घरे लेंटल लेव्हलला आहेत. रमाई आवास योजनेअंतर्गत सहा वर्षात २ हजार ५ घरकुले मंजूर होती. त्यातील १ हजार ६७२ घरकुले पूर्ण झालेली आहेत. १२ लाभार्थ्यांची घरकुले रद्द झालेली आहेत. ५४५ घरकुले अपूर्ण असून १८५ घरे अद्याप सुरु झालेली नाहीत.
नव्याने सुरु झालेल्या मोदी आवास घरकुल योजनेत २०२३- २४ मध्ये १ हजार ६९ घरकुले मंजूर झालेली आहेत. त्यातील ९९० घरकुले अपूर्ण आहेत. ७९ घरकुले पूर्ण झालेली असून १३८ घरकुले लेंटल लेव्हलला तर १२१ लाभार्थ्यांनी घरकुलासाठी पाया खोदलेला आहे. ९९८ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतलेला असून ७३१ घरकुले अद्याप सुरु झालेली नाहीत, असे गटविकास अधिकार राऊत यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, शबरी आवास योजनेत सहा वर्षात करमाळा तालुक्यात ३५ घरे मंजूर होती. त्यातील २१ घरे पूर्ण झाली असून १२ घरे अपूर्ण आहेत. २ लाभार्थ्यांची घरे रद्द झालेली आहेत. ३० लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतलेला असून ७ सात घरे लेंटल लेव्हलला आहेत. ५ लाभार्थ्यांनी अद्याप घरकुल सुरु केलेले नाही. ‘पारधी आवास घरकुल योजना’मध्ये २०१७- १८ मध्ये ७ घरकुले मंजूर होती ती सर्व घरकुले पूर्ण झाली आहेत. नव्याने सुरु झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनामध्ये १ घरकुल मंजूर असून त्याचा पाया खोदलेला आहे, असे राऊत यांनी सांगितले आहे.
करमाळा तालुक्यात लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी राऊत यांचे प्रयत्न सुरु आहेत. घरकुल लाभार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तहसीलदार ठोकडे या देखील मदत करत आहेत शिवाय आमदार शिंदे यांचे देखील सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई होती त्याचा परिणाम घरकुलांवर झाला असून वाळूची उपलब्धता नसल्याने घरकुले पूर्ण होण्यास अडथळा येत आहे. ‘डस’ने बांधकाम केले जात असले तरी ग्रामीण भागात घरकुले पूर्ण करण्यासाठी वाळुचीच मागणी होत आहे.
गटविकास अधिकारी राऊत म्हणाले, यावर्षी पाऊस वेळेत पडला आहे. त्यामुळे आता पाणी उपलब्ध झालेले आहे. जेथे पाणी आहे तेथे घरकुले पूर्ण करणे आवश्यक आहे. ३१ जुलैपर्यंत ही घरकुले पूर्ण होणे आवश्यक आहे. वाळू नसेल तर डसने घरकुलाचे बांधकाम पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.