करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीच्या माढा मतदारसंघात यश मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे करमाळा तालुक्यात ‘जनसंवाद व आभार’ दौरा काढत आहेत. गुरुवारी (ता. २०) सकाळी ९ वाजता वांगी नंबर १ येथून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मोहिते पाटील समर्थक माजी आमदार नारायण पाटील यांचा दौरा सुरु असतानाच हा दौरा काढला जाणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार मोहिते पाटील यांना करमाळा तालुक्यातुन ४१ हजार ५११ मताधिक्य मिळाले. त्यामुळे करमाळा तालुक्यातील मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोहिते पाटील हे माजी आमदार नारायण पाटील, जगताप गटाचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी हा दौरा असणार आहे.
गुरुवारी वांगी जिल्हा परिषद गटातुन या दौऱ्याला सुरवात होणार असुन जिल्हा परिषदच्या नवीन गट रचनेनुसार प्रत्येक गटात ते मतदार व कार्यकर्ते यांच्या भेटी घेणार आहेत. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढणार असल्याचे सांगितले जात आहे.
असा असणार दौरा : गुरुवारी (ता. २०) सकाळी ९ ते १० वाजता वांगी नं. १ येथे राम मंदिर, वाशिंबे येथे १०:३० ते ११:३० वाजता मेन चौक वाशिंबे (चिखलठाण गट), जिंती येथे दुपारी १२ ते १ वाजता (राखीव) राजेभोसले वाडा (कोर्टी गट), वीट येथे दुपारी २ ते ३ वाजता रेवन्नाथ मंदिर, करमाळा येथे दुपारी ३:३० ते ४:३० वाजता दत्त मंदिर (करमाळा शहर), पोथरे येथे सायंकाळी ५ ते ६ वाजता शनि मंदिरासमोर (पांडेगट) व केम येथे सायंकाळी ७ ते ८ वाजता विठ्ठल मंदिर.