करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची करमाळा विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका असणार आहे. सध्या त्यांच्याकडून कोणतीही राजकीय प्रतिक्रिया येत नसली तरी त्यांची भूमिका निर्णायक राहू शकते.
उपाध्यक्ष गुळवे यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गुळवे यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यांचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. याशिवाय विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, बागल गटातील कार्यकर्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याशीही जवळीक आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी गुळवे हे आमदार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर होते. गुळवे यांनी बारामती ऍग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी मोठी मदत केलेली आहे. याशिवाय अनेक तरुणांच्या हाताला काम दिलेले आहे. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तालुक्यातील सर्व गटातील अनेक कार्यकर्ते त्यांना मानतात. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची आहे. या निवडणुकीत त्यांनी उतरावे असा म्हणणाराही एक वर्ग असून त्यांनी कर्तृत्वाच्या जोरावर पवार कुटुंबीयांचा विश्वास कमवला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असून ते काय भूमिका घेतील हे पहावे लागणार आहे.
न्यायालयीन प्रक्रियेत तालुक्यातील श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ऍग्रोकडे भाडेतत्वार जाण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यात गुळवे यांनी संपूर्ण लढाई जिंकली होती. मात्र ऐनवेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून झालेल्या हस्तक्षेपामुळे कारखाना गेला नाही, असा आरोप करमाळा तालुक्याच्या राजकारणात केला जात होता. दरम्यान पवार, पाटील व गुळवे यांचे कारखान्यावरून राजकीय टीका सुरु होती. मात्र लोकसभेच्या माध्यमातून पाटील व गुळवे एकत्र आले आहेत. पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणि पवार यांची पाटील यांच्याबद्दलची भूमिका बदलली. पण आता गुळवे यांची भूमिका महत्वाची आहे.
लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी गुळवे यांनी पश्चिम भागात त्यांची यंत्रणा लावलेली होती. नुकताच खासदार मोहिते पाटील यांचा दौरा झाला तेव्हा काही ठिकाणी गुळवे उपस्थित होते. मात्र विधानसभा निवडणुकीत ते काय भूमिका घेतील हे पहावे लागणार आहे. तालुक्यात गटाचे राजकारण मोठ्याप्रमाणात चालते. येथे पक्षापेक्षा गटाला जास्त महत्व आहे. येथे महायुतीचा उमेवार कोण असेल व महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे निश्चित नाही. मात्र माजी आमदार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. तर आमदार शिंदे हे अपक्ष रिंगणात उतरले तर काय होईल यावर चर्चा रंगत असून त्यात गुळवे यांची भूमिका महत्वाची मानली जाणार आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, प्रा. रामदास झोळ हे देखील विधानसभा निवडणुकीत उतरतील, असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीत जास्त उमेदवार झाले तर मतविभागणी होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात कशा हालचाली होतील, हे पहावे लागणार आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर गुळवे आणि वारे यांच्या भूमिकेबाबत चर्चा केली जाऊ लागलेली आहे.