सोलापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये सततच्या पावसामुळे आणि खरीप हंगाम 2023 दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्यास सरकारने मान्यता देऊन सबंधित तहसिलदार यांनी बाधित शेतक-यांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूरी दिली आहे.
तहसिलदार यांनी शेतकऱ्यांची व्हिके लिस्ट (VK List) ग्रामपंचायतमध्ये प्रसिध्द करणेत आली आहे. तसेच तहसिलदार यांनी तालुक्यातील महसूल मंडळ / तलाठी सज्जा/ आपले सरकार केंद्राच्या ठिकाणी 29 व 30 जूनला ई-केवायसी (E-KYC) करणे बाबत कॅम्पचे आयोजन केलेले आहे. तरी ई-केवायसी (E-KYC) प्रलंबित शेतकऱ्यांनी सदर यादीतीलव्हिके (VK) नंबर घेऊन खालील ठिकाणी/ तालुकास्तरीय महसूल मंडळामध्ये जाऊन ई- केवायसी (E-KYC) प्रमाणिकरण करून घ्यावेत. तद्नंतरच मदतीची रक्कम शासनामार्फत शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी संगीतले आहे.
करमाळा : ई- केवायसी (EKYC) करावयाचे ठिकाण महसूल मंडळ : करमाळा, कोर्टी, केतुर, केम, जेऊर, अर्जुननगर, उमरड, सालसे, पोथरे, जिंती, पांगरे.
माढा : ई-केवायसी (EKYC) करावयाचे ठिकाण : माढा तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र येथे आयोजित केले आहे.
बार्शी : ई- केवायसी (EKYC) करावयाचे ठिकाण : बार्शी तालुक्यातील तलाठी सज्जाच्या ठिकाणी आयोजित केलेले आहे.
माळशिरस : ई-केवायसी (EKYC) करावयाचे ठिकाण- महसुल मंडळ : माळशिरस, पिलीव, दहिगांव, नातेपुते, सदाशिवनगर, इस्लामपूर, वेळापूर, अकलूज, लवंग, महाळुंग, खुडूस, फोंडाशिव.
सांगोला : ई-केवायसी (EKYC) करावयाचे ठिकाण : महसूल मंडळ : सांगोला, शिवणे, नाझरा, कोळा, हत्तीद, महुद, संगेवाडी, सोनंद, जवळा, घेरडी.
ज्या शेतकऱ्यांचे त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रावर संयुक्त नांव आहे आणि त्यांचे नाव दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट केलेले नाही. अशा शेतकरी यांनी संमतीपत्र तात्काळ तहसिलदार यांचेकडे सादर करावे जेणेकरुन त्यांना अनुदान देणेची कार्यवाही करता येईल. तसेच सरकारच्या वतीने आतापर्यंत केलेल्या पेमेंटमध्ये आधारकार्ड बैंक खात्याशी लिंक नसणे, इनॲक्टिव (Inactive) आधारकार्ड या कारणामुळे पेमेंट रिजेक्टेड (Rejected) झाले आहे. अशा शेतक-यांनी बँकेमध्ये जाऊन त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक करणे व आधार केंद्रावर जाऊन आधारकार्ड ॲक्टिव (Active) करणे आवश्यक आहे. त्यानंतरच मदतीची रक्कम शासनामार्फत संबंधित खातेदारांच्या खातेवर जमा होईल. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनिषा कुंभार यांनी दिली.