करमाळा (अशोक मुरूमकर) : बिटरगाव श्री येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे एसटी स्टँड (पीकअप शेड) मिळाले आहे. यामुळे आमदार संजयमामा शिंदे समर्थकांसह गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिटरगाव श्री येथील ग्रामपंचायत शिंदे गटाच्या विरोधात आहे. तरीही आमदार शिंदे यांच्याकडून दुजाभाव न करता विकास कामांसाठी कार्यकर्त्यांना बळ दिले जात आहे.
करमाळा- जामखेड रस्त्यावर बिटरगाव श्री फाटा आहे. तेथून २ किलोमीटरवर गाव आहे. येथून विद्यार्थी व नागरिक कामानिमित्त एसटीने करमाळ्याला येतात. बिटरगाव श्री फाटा येथे निवाऱ्याची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे येथे एसटी स्टँड होणे आवश्यक होते. त्यामुळे आमदार शिंदे गटाच्या समर्थकांनी एसटी स्टँडची मागणी केली होती. बिटरगाव श्री ग्रामपंचायत विरोधात असतानाही आमदार शिंदे यांचा आदेश पाळत शिंदे समर्थकांनी लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम करत मताधिक्य दिले होते.
आमदार शिंदे यांनी बिटरगाव श्री येथे ग्रामपंचायतमध्ये सत्ता नसतानाही कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अनेक दिवसांपासून रखडलेला बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता दिला आहे. या रस्त्यामुळे वर्षानुवर्षे चिखलातून जाणारे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आणखी निधीची आवश्यकता असून त्यालाही निधी दिला जाणार असल्याचे, आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले आहे.
या रस्त्यासाठी आमदार शिंदे यांनी यापूर्वीही ३ लाख रुपये दिले होते. मात्र आमदार शिंदे यांच्या विरोधकांनी हे काम केले नव्हते. आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार राजू भोसले यांच्या घराजवळील हातपंप व वाकळे वस्ती येथे हातपंपावर सौर यंत्रणा मंजूर केली आहे. गावातील प्रवीण घोडके घर ते पांडुंरग घोकडे घर व विश्वास भोसले घर ते देविदास खराडे घर या दरम्यान फेव्हिंग ब्लॉक बसवण्यास निधी उपलब्ध करून दिला आहे. गावातील प्रवीण मुरूमकर घर ते केरबा नलवडे घर, अशोक जाधव वस्ती ते गोकुळ जाधव वस्ती (बोरजाई रस्ता) व मारुती मंदिरासमोर फेव्हिन्ग ब्लॉक बसवण्यासाठी निधीची मागणी केली आहे. लवकरच ही कामे देखील मार्गी लागणार आहेत. बिटरगाव श्री ग्रामपंचायत इमारत व कॅनल देखील मार्गी लागावी यासाठी शिंदे समर्थक कार्यकर्त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. अशोक मुरूमकर यांच्या वस्तीवर (शिवाजी नगर) भागीरथचा ट्रान्सफार्मर दिला आहे.
बिटरगाव श्री येथे आमदार संजयमामा यांच्या गटासाठी ग्रामपंचायत सदस्य चत्रभुज मुरूमकर, ज्येष्ठ नेते बबनदादा मुरूमकर, माजी सरपंच संतोष वाघमोडे, गजेंद्र बोराडे, दादा मुरूमकर, दिलीप मुरूमकर आदी काम करत आहेत. याशिवाय इतरही कार्यकर्ते काम करत आहेत. बिटरगावच्या विकासासाठी विरोध बाजूला ठेऊन काम करण्याचे आवाहन कार्यकर्ते करत आहेत.