करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालयात पुरवठा शाखेत सध्या मन्युष्यबळाची कमतरता आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे या विभागात गर्दी वाढली आहे. त्याचा ताण यंत्रणेवर येत असून नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसात येथे मन्युष्यबळ उपलब्ध केले जाणार असून त्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरु आहेत, कोणाचीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जात असून कोणीही अफवा पसरवू नये व एजंटगिरीला बळी पडू नये, असे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी स्पष्ट केले आहे.
पुरवठा शाखेतून नवीन रेशन कार्ड, नावं कमी करणे, नाव वाढवणे, महात्मा फुले आरोग्य योजनेच्या मदतीसाठी दाखला; अशी दैंनदिन कामे सुरु असतात. त्यात आता ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’च्या लाभासाठी रेशन कार्डात नाव वाढवणे या कामासाठी लाभार्थ्यांची गर्दी वाढली आहे. रोज साधणार ३०० अर्जांची आवक असून निकाली निघण्याचे प्रमाण कमी आहे. येणारे अर्ज आणि त्यासाठी लागणारे मन्युष्यबळ याचा मेळ सध्या बसत नाही. त्यामुळे येथे मन्युष्यबळ उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु झालेला आहे.
सध्या पुरवठा अधिकारी म्हणून काम पहाणारे अनिल ठाकर यांच्याकडे जेऊर मंडळ अधिकारी व पोथरेचा अतिरिक्त पदभार आहे. असे असतानाही नागरिकांची कामे वेळेत होण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. त्यात सध्या ऑनलाईनचे काम बंद आहे, त्यामुळे नागरिकांना हेलपाटे बसत आहेत. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात असून कोणीही एजंटला पैसे देऊन काम करून घेऊ नये. यात एजंट म्हणून काम करत आहे, असे निदर्शनास आले किंवा आणले तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार ठोकडे यांनी दिला आहे.
का ओ होनराव साहेब असं केले? करमाळा एसटी आगारावरील विश्वास उडत आहे काय?
पुरवठा विभागाची जबाबदारी ठाकर यांच्याकडे आहे. मात्र त्यांच्याकडे इतरही पदभार आहे. पुरवठा विभागात नागरिकांची अनेक दिवसांपासून राहिलेली प्रलंबित प्रकरणे निकाली लावण्याचे काम तहसीलदार ठोकडे यांनी योग्य नियोजन करून केले आहे. आणि ते काम अजूनही सुरु आहे. आहे त्या यंत्रणेत काम करून घेण्यावर त्यांचा भर असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून येथे मन्युष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुरवठा विभागात रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे व कमी करणे यासह इतरही कामे ऑनलाईन आहेत. नागरिकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोणाचीही अडवणूक होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत, असे तहसीलदार ठोकडे यांनी स्पष्ट केले आहे. अनेकदा दिवसांची राहिलेली कामे करत असताना काही अर्जात त्रुटीही असल्याचे समोर येत आहे. त्याचीही पूर्तता होणे आवश्यक आहे.