करमाळा (सोलापूर) : मोहरम व आषाढी एकादशीनिमित्त करमाळा पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी करमाळा शहरातील मुस्लीम बांधव, सामाजिक व राजकीय काम क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले, मोहरम व आषाढी एकादशीनिमित्त सर्व समाजातील नागरिकांनी शांततामय वातावरणात साजरे करावेत. कायद्याचे पालन करावे, वेळेचे बंधन पाळावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. मोहरमच्या काळातच करमाळा शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी जाणाऱ्या विविध दिड्यांचे आगमन होवून पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत, अशा वेळी एकाच वेळेस पोलिस प्रशासनावर ताण वाढणार आहे. यावेळी आपण सर्वांनी सहकार्य करुन दोन्ही उत्सव शांततेत साजरे करावेत.
सकल मुस्लीम समाजाचे शहर अध्यक्ष व जामा मस्जिदचे विश्वस्त अध्यक्ष जमीर सय्यद म्हणाले, आजपर्यंत मुस्लीम समाजातर्फे शिवजयंती, गणेश विसर्जन मिरवणुकीत समाजातर्फे जामा मस्जिद येथे येणाऱ्या मिरवणुकीचे स्वागत मोठ्या आनंदाने स्वागत केले जाते. करमाळा शहरात येणाऱ्या दिंडीचे स्वागत मुस्लीम समाजातर्फे करण्यात येणार आहे.
यावेळी मुस्लीम जेष्ठ नेते फारुख जमादार, आझाद शेख, नासीर कबीर, अलीम भाई, आशपक सय्यद, नाल साहेब सवारीचे मुजावर अलीम खान, सामाजिक कार्यकर्ते आयुब शेख, युवक नेते दिशान कबीर, मुख्तार पठाण उपस्थित होते.