करमाळा (सोलापूर) : मागील भांडणाचा राग मनात धरून एकाला जीव मारण्याची धमकी देत लोखंडी गजाने मारहाण करत गंभीर दुखापत केली असल्याची घटना घोटी येथे घडली आहे. यामध्ये एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सतीश शिवाजी चांगण (रा. पाथुर्डी, ता. करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सतीश मोहन जानकर (रा. पाथुर्डी) हे यामध्ये जखमी झाले असून त्यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी जानकर हे ढवळस येथे तालमीत कुस्तीचा सराव करतात. संशयित आरोपी चांगण व फिर्यादी जानकर यांचे दीड वर्षांपूर्वी किरकोळ कारणातून भांडण झाले होते. तेव्हापासून ते एकमेकांना बोलत नव्हते. ते दोघेही एकमेकांचे आधी चांगले मित्र होते. सहा महिन्यापूर्वी ते एकमेकांना बोलायला लागले होते. शनिवारी (ता. ६) जानकर हा तालमीत असताना चांगण याने त्याला घोटी येथे जायचे असल्याचे सांगत आग्रह धरून बोलावून घेतले.
त्यानंतर दोघेही मोटारसायकलने निघाले. दरम्यान घोटी येथील जगदंबा हॉटेलमध्ये ते थांबले. तेथे संशयित आरोपी चांगण याने एक बिअर घेतली. तर फिर्यादी जानकर याने स्टिंग घेतले. तेव्हा हॉटेलपासून काही अंतरावर ते बोलत बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असतानाच संशयित आरोपीने अचानक फिर्यादीच्या मागे जाऊन लोखंडी गजाने मारहाण केली.
फिर्यादी जानकर हे बेसावध असताना चांगण याने मारहाण केल्याने डोक्यातून रक्त आले. ‘तेव्हा मला का मारत आहे’, असे जानकर यांनी विचारले. तेव्हा ‘तुला जिवंत सोडायचे नाही. माझा हिसका दाखवतो,’ असे म्हणत संशयित आरोपीने धमकी दिली. दरम्यान जानकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.