करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. त्याचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत असून महिलांच्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या परिसरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी मदत कक्ष सुरू करण्यात येत आहे. याचे याचे उदघाटन सोमवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते होणार आहे.
आमदार शिंदे यांच्या माध्यमातून सुरु होत असलेल्या कक्षामध्ये योजनेचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज विनाशूल्क भरून दिले जाणार आहेत. उद्घाटनावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी जाधव व उमेद अभियानचे योगेश जगताप उपस्थित राणार आहेत. याचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा तालुक्यातील विविध गावातील अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन अर्ज भरले असतील व ते ऑनलाईन नोंदवायचे राहिले असतील तर असे अर्जही या कार्यालयात जमा केल्यास ते विनाशुल्क ऑनलाइन भरून दिले जाणार आहेत. आमदार शिंदे यांच्या या कार्यालयामुळे महिलांना मोठी मदत होणार आहे.