करमाळा (सोलापूर) : करमाळा भुमिअभिलेख कार्यालयात खाजगी व्यक्तीकडून संगणकावर सर्व प्रकारच्या नोंदीचे काम उपअधीक्षक भूमि अभिलेख यांच्याच माध्यमातून चालत असल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये सामान्य नागरिकांची पिळवणूक होत असून याबाबत चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी तक्रार जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुख जमादार यांनी केली आहे.
जमादार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात वारस नोंदी, बक्षीस पत्र नोंद, हक्क सोड पत्र, नोंद मृत्युपत्र नोंद, गहाणखत, आधी अन्य कारणांची नोंद करण्यासाठी खाजगी व्यक्तीकडून केले जात आहे. या कार्यालयात बेबंद कारभाराच्या संदर्भात अनेक आंदोलने झाली, नोटा घेऊन आंदोलन केली. अधिकाऱ्याच्या टेबलावर नोटांचे बंडलसुद्धा टाकण्यात आले व काम करा, अशा मागण्या करण्यात आली. मात्र या विभागातील तात्काळ चौकशी करून खाजगी काम करणाऱ्याला हाकलून देण्यात यावे व अधिकृत कामगाराची या ठिकाणी नेमणूक करावी, अशी मागणी जमादार यांनी केली आहे.