करमाळा (अशोक मुरूमकर) : खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत करमाळा पंचायत समिती येथे अधिकारी व बाधित शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावर अधिकाऱ्यांनीही त्यांची बाजू मांडली. दरम्यान ‘लवकर येईचं असत म्हणत’ मोहिते पाटील हे एका प्रश्न विचारणाऱ्यावर चिडले. तेव्हा सभागृहात हश्याही पिकला.
खासदार मोहिते पाटील यांनी शुक्रवारी अधिकारी व बाधित शेतकऱ्यांची बैठक घेतली. माजी आमदार नारायण पाटील, उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, कार्यकारी अभियंता श्रीमती पाटील, उपकार्यकारी अभियंता के. एम. उबाळे आदी उपस्थित होते.
करमाळा पंचायत समिती येथे होणाऱ्या बैठकीचा वेळ सकाळी साडेदहा देण्यात आलेला होता. मात्र वेळेच्या आधी खासदार मोहिते पाटील हे पंचायत समिती येथे आले. गटविकास अधिकारी राऊत यांच्या कक्षात ते काहीवेळ बसले. बैठक सुरु झाली तेव्हा जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे अधिकारीही उपस्थित नव्हते. मात्र तोपर्यंत बैठक सुरु करण्यात आली होती. काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीलाच खासदार मोहिते पाटील यांनी कोणीही डबल (तेच तेच) प्रश्न विचारू नका, सर्व शंकांचे निरासन केले जाईल असे सांगितले होते.
करमाळा बायपास येथील भूसंपादनाबाबत शेतकऱ्याने प्रश्न केला. त्यावर उत्तरही देण्यात आले. त्यानंतर मांगी येथील शेतकऱ्याने प्रश्न विचारले. त्यावर आंबेकर यांनी नवीन रेडीरेकनर दरानुसार मोबदला दिला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तो प्रश्न तेथेच संपला होता. दरम्यान जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे अधिकारी आले. त्यांनी नगर ते जातेगाव जसा चार लेन रस्ता झाला आहे. तसाच जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे काम होणार आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे काम हे राज्य सरकार करणार आहे असे हिंदीत स्पष्ट सांगितले. रस्त्यासाठी किती गावांचे क्षेत्र जाणार आहे? त्यांचे भूसंपादन कसे होणार आहे हे त्यांनी सांगितले. त्यावर खासदार मोहिते पाटील यांनीही त्यांचे मत मांडले.
दरम्यान करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष (शरद पवार गट) संतोष वारे, डॉ. अमोल घाडगे, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे यांनी त्यांची मते मांडली. मिटिंग सुरु असताना ते- तेच मुद्दे येऊ लागल्याने खासदार मोहिते पाटील यांनी रिपीट प्रश्न करू नका असे सांगितले. मध्येच प्रा. ऍड. गोवर्धन चवरे यांनी मागे उभे राहून माईक हातात नसताना मोठ्या आवाजात करमाळा बायपास येथील उड्डाण पूलचा विषय मांडला.
जातेगाव ते टेंभुर्णी मार्गाचे भूसंपादन किती होणार? याबाबत शंका व्यक्त केल्यानंतर हे काम चार लेनमध्ये होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर खासदार मोहिते पाटील हे बोलत होते. ‘भूसंपादन कमी झाले तरी रस्ता चार लेनच होणार आहे आता तुम्ही सांगा तुम्हाला जमिनी कमी द्यायच्या आहेत का जास्त?’ असा प्रश्न केला. त्यावर ऍड. चवरे बोलू लागले. त्यांना प्रांताधिकारी आंबेकर यांनी थांबवले आणि बोलू लागल्या तेवढ्यात पुन्हा एकाने आधी पैसे मग रस्ता म्हणत आवाज केला. त्यावर त्या म्हणाल्या ९० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरु होणार नाही. आधी पैसे देऊन मी काय करू? तुम्ही शकार्य केले तरच काम सुरु होईल. वर्षभरात हे पैसे ऑनलाईन जमा होतील.
उपविभीगीय अधिकारी आंबेकर या बोलत असतानाच बहुजन संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी उभाराहून समोरील माईक हातात घेतला. तेव्हा खासदार मोहिते पाटील हे त्यांना एक मिनिट थांबा असे सांगत होते. मात्र तरीही त्यांनी त्यांचे बोलणे सुरु ठेवले. ‘या उपस्थित शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की ज्या जमिनी जाणार आहेत त्याबद्दल काही म्हणणे नाही. फक्त शेतकऱ्यांची तळमळ एवढी आहे की, जे भूसंपादन होणार आहे ते काय रक्कमेने होणार आहे? आम्हाला मोबदला कसा मिळणार आहे? हे प्रत्येकाचे अंतःकरणापासून मत आहे’, असे म्हणतानाच उपस्थितांनीच या विषयावर चर्चा झाली आहे असे सांगितले. त्यानंतर खासदार मोहिते पाटील यांनी त्यांच्याकडे पाहत माईकसाठी हात केला. कदम यांनी माईक दिल्यानंतर त्यांनाच उद्देशून ‘लवकर येईचं असतं मीटिंगला’ म्हणाले. त्यावेळी खासदार मोहिते पाटील यांच्या चेहऱ्यावर चिड दिसत होती. मात्र उपस्थितांमध्ये चांगलाच हश्या पिकला.