सोलापूर (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीसाठी 20 सप्टेंबरदरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्टपर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही गतीने करावी, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचित केले आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज (शनिवारी) जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपायुक्त नियोजन संजय कोलगणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधीअंतर्गत विविध विकासात्मक कामाचे प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडे सादर करावेत. विधानसभा आचारसंहिता 20 सप्टेंबरदरम्यान लागेल असे गृहीत धरून सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्टपर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही अत्यंत गतीने करावी.