करमाळा (सोलापूर) : शेतकरी, मोलमजूर, विधवा निराधार महिला, दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी प्रहारच्या वतीने बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. 9) संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी करमाळा तालुक्यातून 200 गाड्या जाणार आहेत. या आंदोलनासाठी शेतकरी, दिव्याग बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील व करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केले आहे.
सोलापूर जिल्हा सरचिटणीस बापू तळेकर, युवा जिल्हा उपाध्यक्ष युनूस पठाण, युवा तालुकाध्यक्ष विकी मोरे, महिला तालुकाध्यक्ष स्वाती गोरे, उपाध्यक्ष पप्पू ढवळे, सोमनाथ जाधव, सोलापूर जिल्हा आघाडी कार्याध्यक्ष पप्पू कोंडलकर यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांच्या मानधनात वाढ करून 6 हजार करावे, विना आट घरकुल देण्यात यावे, भूमिहीन दिव्यांना २०० स्क्वेअर फुट सरकारी जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावी. यासह शेतकरी शेतमजूर यांच्या पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे MRGS रोजगार हमी योजनेमार्फत करणे, नव्याने युवा धोरण व बेरोजगार युवकांसाठी किमान 5000 कोटींची तरतूद करणे, पेपर फुटी कायदा बनविणे. शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी स्वातंत्र्य आर्थिक विकास महामंडळ तयार करणे, कांद्याला हमीभाव देण्यात यावा, कांदा निर्यात बंदी संदर्भात हे ठाम धोरण असावें, घरकुलांसाठी 5 लाख रुपये व शहर व ग्रामीण भागात समान निधी असावा, शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये विषमता हटवून समानता आणावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व पुढील दोन वर्ष कर्जाच्या मुदल मध्ये माफी असणे, अशा मागण्यासाठी हे आंदोलन होणार आहे.