करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘मुलाची दारू सोडविण्यासाठी घरातील गुप्तधन, सोने काढावे लागेल, घरातील पित्रे व करणी बाधा काढून देते’ असे म्हणून करमाळा व तांदुळवाडी येथे वेळोवेळी १ लाख १७ हजार रुपये घेऊन तांत्रिक- मांत्रिक विद्या व जादू टोणा करून फसवणूक केल्याप्रकरणी मौलालीमाळ (करमाळा) येथील एका महिलेविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मी हरिदास आडम असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिला आरोपीचे नाव आहे. यामध्ये शबाना अबू मुजावर (वय ४२, रा. तांदुळवाडी, ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मुजावर यांचा मुलगा नसीरला दारूचे व्यसन होते. त्याची दारू सुटावी म्हणून प्रयत्न सुरु होते. तेव्हा करमाळ्यातील एक महिला दारू सोडविते, अशी त्यांना माहिती मिळाली. त्यावर त्यांनी ७ जुलैला संशयित आरोपी आडम यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दरम्यान संशयित आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला ‘तुझ्या घरी भुते आहे. गुप्तधन सोने आहे. पित्रे आहेत,’ असे म्हणून ‘ते नाही काढले तर तुझ्या घरातील सर्व लोक मरतील’, असे सांगितले. त्यावर घाबरून फिर्यादीने संशयित महिलेला यावर काय उपाय असे विचारले तेव्हा तिने घरी पूजा करावी लागेल असे सांगितले.
पाण्यासाठी झालेल्या रस्ता रोको प्रकरणी ४० शेतकऱ्यांवर करमाळा पोलिसात गुन्हा
तेव्हा गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेने पूजा करण्यासाठी फिर्यादी महिलेला ऍडव्हन्स पैसे देण्याची मागणी केली. त्यावर फिर्यादीने तिला २००० रोख दिले. त्यानंतर तिने मी चारचाकी गाडीने साहित्य घेऊन घरी येते तुम्ही पुढे जा, असे सांगितले. त्यानंतर घरी जाऊन तिने मी यल्लमा देवीची भक्त आहे असे सांगून कन्नड भाषेत मंत्र म्हणत पूजा केली. त्यानंतर तिने १४ हजार ५०० रुपये रोख घेतले. व पूजा केलेल्या घरात न जाण्याचे सांगितले आणि ती तेथून निघून गेली.
त्यावर ११ जुलैला पुन्हा ती घरी आली. आणि तुमच्या घरातील पित्रे निघाली नाहीत, असे म्हणाली. तेव्हा तिने पुन्हा येथे जीवदान देण्याचे सांगितले. त्यावर पाच कोंबड्या आणण्यास सांगितले. त्यावर पुनः पूजा करून तिने त्यांच्याकडून १८ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा १४ जुलैला तिने फिर्यादीच्या घरी येऊन पूजा केलेल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. काही वेळाने तिने दरवाजा उघडला व तेथे कोपऱ्यात हळदीने सारवून घेतलेले दिसले. त्यावर मोहरी, लिंबू टाकले व तेथे सोन्याचे मणी पडलेले दिसले. रोज थोडे थोडे सोन्याचे मणी वर येणार असल्याचे त्यांना सांगितले. काढलेले मणी गाळण्यासाठी सोनार आणायचा असल्याचे भासवून तिने पुन्हा २३ हजार ५०० रुपये घेतले.
मामा पक्षाकडून की अपक्ष? कागल, इंदापूरनंतर आता करमाळ्याकडे लक्ष! बागल व चिवटेंमुळे उमेदवारीचा पेच
त्यानंतर पुन्हा १४ जुलैला घरी येऊन तिने चार पायचे जीवदान द्यावे लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी कर्नाटकातून चार मोठी बोकडे आणावी लागतील, असे सांगितले. तेव्हा तिने २५ हजार रुपये घेतले, असे वेळोवेळी तिने आमच्याकडून पैसे घेतले आहेत. व फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.