करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून समजले जाणारे प्रा. रामदास झोळ यांना निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच फटका बसला असल्याची चर्चा आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी झालेल्या आंदोलनावेळी बरोबर असलेले शेतकरी कामगार संघर्ष समितीचे प्रमुख दशरथ कांबळे आता त्यांच्याबरोबर दिसत नाहीत. त्यामुळे कांबळे नाराज आहेत की प्रा. झोळ यांच्यापासून दूर गेले आहेत असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जाऊ लागला आहे.
शेतकरी कामगार संघर्ष समितीचे प्रमुख दशरथ कांबळे यांचे करमाळ्याच्या राजकारणात महत्वाचे नेतृत्व म्हणून नाव घेतले जाते. निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत पगार मिळावेत यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. मकाई सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे थकीत ऊस बील मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन उभारले होते. प्रा. झोळ व कांबळे हे आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. प्रा. झोळ यांनी निवडणुकीत उतरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.
प्रा. झोळ यांची विधानसभा निवडणुकीसाठी तयारीही सुरु आहे. अनेक गावांमध्ये त्याचे दौरे सुरु आहेत. मात्र आता त्यात कांबळे दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे प्रश्न केले जाऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत कांबळे यांनी उघड भूमिका मांडत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे काम केले होते. संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या आपण विरोधात असल्याचे त्यांनी नालबंद मंगल कार्यालय येथे झालेल्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. पुढे ते प्रा. झोळ यांच्याबरोबर राहतील, अशी शक्यता होती. मात्र आता ते दिसत नाहीत त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रा. झोळ यांना कांबळे यांनी तालुक्याच्या राजकारणात चर्चेत आणले अशी चर्चा असून त्यांची भूमिका महत्वाची आहे. कारखान्याच्या बिलासाठी आंदोलने झाली तेव्हा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत हे देखील सहभागी होते. मात्र ते आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक आहेत.
दरम्यान ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना शेतकरी कामगार संघर्ष समितीचे प्रमुख कांबळे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीबाबत आम्ही भूमिका स्पष्ट केलेली नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही कोणाला पाठींबा देईचा की काय करायचे हा निर्णय घेणार आहोत. राज्यातील राजकीय परस्थितीचा विचार करून योग्य तेच करणार आहोत. शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी व कामगारांच्या हितासाठी आम्ही आंदोलन केले होते. त्यात प्रा. झोळ व आम्ही एकत्र आलो होतो. निवडणुकीबाबत आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. प्रा. झोळ यांचा व्यक्तिगत दौरा आहे माझ्या त्यांच्याशी चर्चा होत आहे.’