सोलापूर : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर येथे होत आहे. या मेळाव्यासाठी 30 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेने जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पोलीस उपाधीक्षक गृह विजया कुर्री, पोलीस उपायुक्त वाहतूक सुरेश खिरडकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार म्हणाल्या, माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागांना जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे. दिलेल्या जबाबदारी प्रमाणे सर्व संबंधित विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांच्याकडून चोखपणे काम करून घ्यावे. कोणत्याही विभागाला आपल्या कामाविषयी शंका असेल तर त्याचे निरसन तात्काळ करून घ्यावे, असेही त्यांनी सुचित केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी बसण्याची व्यवस्था अत्यंत चांगली करावी. पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन ही काटेकोरपणे करावे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे यासाठी आवश्यक असलेल्या बसेसची पूर्तता करावी. पुरवठा विभागाने लाभार्थ्यांसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करावी. तसेच सर्व संबंधित विभागाने परस्परात योग्य समन्वय ठेवून मेळावा व्यवस्थितपणे पार पडेल यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थी आणले जाणार आहेत, त्यासाठी लाभार्थ्याच्या संख्या प्रमाणे प्रत्येक तालुक्याला बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी लाभार्थी व्यवस्थितपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील व त्यानंतर ते व्यवस्थितपणे त्यांच्या घरी पोहोचतील याचे योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सुचित केले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक विभागावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती बैठकीत सादर केली.