करमाळा (सोलापूर) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ महिन्यात पुतळा कोसळने ही निषेधार्हबाब असून मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र यात वादग्रस विधान केले आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुनील सावंत यांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील १३ कोटी नागरिकांची माफी मागितली पण अशी बुद्धी मंत्री केसरकर यांना कधी येणार असेही संवत यांनी म्हटले आहे.
मालवण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला आहे. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून याचा निषेध करण्यासाठी समस्त शिवभक्त करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने आज (गुरुवारी) सकाळी करमाळ्यातील छत्रपती चौकात श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी सर्व समाजातील समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सावंत, ऍड. कमलाकर वीर, सचिन काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
सावंत म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने सर्व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात सर्व समाज बांधव एकत्र आले. सरकारने यांचा गांभीर्याने विचार करावा, मंत्री दीपक केसरकर यांनी केलेले वादग्रस्त विधान हे निषेधार्ह आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही.