करमाळा (सोलापूर) : शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्यांनी संस्काराचेही बाळकडू अंगी बाळगावे व नैतिक मूल्यांची जोपासना केल्यास विद्यार्थी त्याच्या जीवनात उत्तुंग यश संपादन करू शकतो. त्यामुळे त्यांनी शिक्षणाबरोबरच व्यायाम, योगा, ध्यानसाधनालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पोलिस निरीक्षक घुगे बोलत होते. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीतही न डगमगता ध्येय निश्चित करावे. ध्येय निश्चित करून, वाटचाल केल्यास वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिस्त व भौतिक सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रवास करताना वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या नियमाचे विद्यार्थ्यांनी पालन करावे. विद्यार्थी दशेत आपल्या हातून कोणताही गैरप्रकार करणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वय प्रा. लक्ष्मण राख यांनी केले तर आभार प्रा. एम. डी. जाधव यांनी मानले.