करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात भवानी नाका परिसरात बिनवडे रुग्णालय येथे प्रसूतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शीतल भाऊसाहेब करगळ (वय २९, रा. रावगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी, सासू, सासरे, पती, आई- वडील असा परिवार आहे. अंजनडोहचे माजी सरपंच अरुण शेळके यांची मुलगी व मकाईचे संचालक गोवर्धन करगळ यांची ती सून आहे. या घटनेनंतर कुटुंबियांकडून संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित घटनेची संपूर्ण चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर मृत्यूस जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शितल करगळ यांचे माहेर अंजनडोह आहे. माजी सरपंच अरुण शेळके यांच्या कन्या आहेत. त्यांचे सासर रावगाव आहे. प्रसूतीसाठी त्यांना करमाळ्यात बिनवडे रुग्णालय येथे दाखल केले होते. मात्र संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांचा आहे. संबंधित डॉक्टरांनी वेळीच खबरदारी न घेतल्याने सिजरदरम्यान मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला. त्यानंतर त्यांना नगर येथे हलवण्यात आले. परंतु त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. याला बिनवडे रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार आहेत. त्यांची संपुर्ण चौकशी करण्यात यावी व तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावेत, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी नातेवाईकांना त्यांचे म्हणणे देण्यासाठी सांगितले असून नगर येथून रिपोर्ट आल्याबरोबर कायदेशीरदृष्ट्या आपण कारवाही करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे, रावगावचे संदीप शेळके आदी उपस्थित होते. या घटनेमुळे बिनवडे रुग्णालय आज बंद होते. दरम्यान करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन बंद सांगत आहे.