करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकारने करमाळा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी दिला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडाअंतर्गत 282.75 कोटी निधी असलेली विविध कामे, 34 कोटी 68 लाख निधी मंजूर असलेल्या करमाळा शहरातील नवीन प्रशासकीय इमारत तर करमाळा तालुक्यात हॅम अंतर्गत 271 कोटीच्या रस्त्याचा समावेश आहे. यावेळी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा व प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
खासदार सुनिल तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार संजयमामा शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील, उपअभियंता कुडलिक उबाळे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकस्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबण्यास मदत होणार आहे. उजनी जल पर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा एकूण 282.75 कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्या अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करमाळा येथे करण्यात आले.
करमाळा शहरातील विविध उपविभागीय कार्यालय तसेच तालुकास्तरीय कार्यालयांसाठी नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता होती. या इमारतीसाठी 34 कोटी 68 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन ही श्री. पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. त्याप्रमाणेच रस्ते विकास महामंडळ अंतर्गत हॅम (HAM)सावडी जिल्हा हद तालुका करमाळा ते वेणेगाव तालुका माढा या 71 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी 271 कोटी 55 लाखाचा निधी मंजूर असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.