करमाळा (अशोक मुरूमकर) : राजुरी येथे वीज उपकेंद्राचे नुकतेच भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे. एका नागरिकाने पारेवाडी- दिवेगव्हाण ते सावडी या रस्त्याचा प्रश्न मांडला. त्यावर आमदार शिंदे यांनी केलेलं ते विधान होते. आमदार शिंदे म्हणाले ‘महाराज तुम्ही सांगितलेलं काम होईल. येथे २०- २० वर्षांचं धुणं आहे. ते धोयला थोडा वेळ लागेल. आपण तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावत आहोत. त्यामुळे तुम्ही निश्चित रहावा’, असे म्हणत त्यांनी मतदारांचा विश्वास कमवण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार संजयमामा शिंदे हे भाषणात कोणावरही टीका करत नाहीत हे सर्वांना माहित आहे. कोण एखादा प्रश्न घेऊन गेला तर ते काम करण्यास प्राधान्य देतात. एखाद्याची तक्रार किंवा विरोधकांचेही ते काम करतात, असे विरोधी गटातील काही मंडळी खासगीत बोलताना सांगतात. त्यात राजुरी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार शिंदे यांनी भाषण सुरु केले. उपस्थितांची नावे घेऊन मुख्य विषयाकडे येताच एकाने पारेवाडी- दिवेगव्हाण- सावडी रस्त्याचा प्रश्न मांडला आणि त्यांना उत्तर दिले.
‘२०- २० वर्षाची धुणी आहेत. सर्व धुणी धुणार आहे,’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये हश्या पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. आमदार शिंदे म्हणाले, ‘सर्वांच्या साक्षीने वीज उपकेंद्राचे काम सुरु होत आहे. हे काम मार्चपर्यंत संपणार असून एन उन्हाळ्यात हे वीज उपकेंद्र सुरु होणार आहे. तेव्हा त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. या पाच वर्षात कसे सरकार राहिले हे सर्वांनी पाहिले. सर्व सत्तेत आणि विरोधात होते. त्यात कोरोनाचा काळी अनुभवला. असे असतानाही तालुक्यातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, तालुक्यात अनेक प्रश्न जुने आहेत. डिकसळ पुल, टेंभुर्णी- जातेगाव महामार्ग हे प्रश्न जुने आहेत. त्याची हस्तांतर एनओसी घेण्यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि फोटो काढला म्हणजे काम झाले असे होत नाही. त्यासाठी पाठपुरावा महत्वाचा असतो. जातेगाव- टेंभुर्णी महामार्गाची तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे मी २८ वेळा गेलो होतो. तालुक्यात पुनर्वसित गावातील अनेक प्रश्न आहेत. वांगी येथे सर्व रस्ता झाला मात्र ७०० मीटर रस्त्याला अडचण आली. कोणी काहीही म्हणाले तरी मी त्याकडे लक्ष देत नाही. तालुक्यासाठी मी किती निधी आणला हे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. पोन्धवाडी बोगद्याचा विषय पाठपुरावा करून मार्गी लावला. प्रत्येक भागात आपण विषय मार्गी लावले आहेत. वीज उपकेंद्राचे विषय आम्ही मार्गी लावले आहेत, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले आहेत. कुकडी उजनी उपसासिंचन योजनेमध्येही आपल्याला १०० टक्के रिझल्ट दिसेल. विजेचे प्रश्न सोडवण्यावर डोळसपणे काम केले आहे. कुकडी उजनी उपसासिंचन योजना ही मतांसाठी काढलेली योजना नाही. तो विषय निवडणुकीच्या तोंडावर काढलेला असला तरी त्यात पाठपुरावा करून मार्गी लावण्यावर भर दिला आहे.
वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, सूर्यकांत पाटील, माजी सरपंच चंद्रकांत सरडे, वामनराव बदे, माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, अशोक पाटील, सुहास गलांडे, श्री कलावते, अॅड. अजित विघ्ने, श्री गिरंजे, नंदकूमार जगताप, श्री. रारंगकर, दीपक खाटमुडे, आरआर बापू, उदय साखरे, नवनाथ दुरंदे आदी उपस्थित होते.